ऑस्ट्रेलियाकडून हिजबुल्लाह दहशतवादी संघटना घोषित

कॅनबेरा – ‘लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाहपासून ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला वास्तविक धोका आहे’, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाने हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना घोषित केले. याबरोबर ऑस्ट्रेलियाने हिजबुल्लाहच्या राजकीय, सामाजिक तसेच सशस्त्र संघटनांना दहशतवादी गटांच्या यादीत टाकले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने हिजबुल्लाहच्या सशस्त्र संघटनेलाच दहशतवादी घोषित केले होते.

ऑस्ट्रेलियाकडून हिजबुल्लाह दहशतवादी संघटना घोषित‘लेबेनॉनमधील हिजबुल्लाह नियमितपणे दहशतवादी हल्ल्यांसाठी चिथावणी त्याचबरोबर दहशतवादी संघटनांना पाठिंबा देत आली आहे’, असे सांगून ऑस्ट्रेलियाचे अंतर्गत सुरक्षामंत्री करेन अँड्य्रूज यांनी हिजबुल्लाहवरील कारवाईचे समर्थन केले. ऑस्ट्रेलियाने नुकतेच कोरोनाबाबतचे नियम शिथिल केले आहेत. याचा फायदा घेऊन शेकडो लेबेनीज ऑस्ट्रेलियात दाखल होऊ शकतात व आपले सरकार हा धोका ओळखून असल्याचे अँड्य्रूज यांनी सांगितले.

या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियातील हिजबुल्लाहसंलग्न संघटनेचा सदस्य होण्यावर बंदी असेल. त्याचबरोबर हिजबुल्लाहशी जोडलेल्या संघटनेसाठी निधी गोळा करणे किंवा निधी देणार्‍यांवरही कारवाई केली जाईल. १९७६-८१ दरम्यान लेबेनॉनमध्ये भडकलेल्या गृहयुद्धाच्या काळात शेकडो लेबेनीज ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले होते. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सव्वा दोन लाखांहून अधिकजण लेबेनीजवंशाचे असून सिडनी आणि मेलबर्नच्या भागात लेबेनीजवंशियांची वस्ती अधिक प्रमाणात आहे.

नोव्हेंबर महिन्यात ग्लास्गो येथे संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केलेल्या हवामानबदल परिषदेच्या निमित्ताने इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतली होती. इस्रायलच्या पंतप्रधानांनी यावेळी हिजबुल्लाहवर संपूर्ण बंदी टाकण्याची मागणी केली होती. बुधवारच्या या निर्णयानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे आभार मानले. तसेच इस्रायल व ऑस्ट्रेलिया यापुढेही दहशतवादाविरोधात सहकार्य सुरू ठेवतील, अशी अपेक्षा बेनेट यांनी व्यक्त केली.

इस्रायलला खूश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आंधळेपणाने हा निर्णय घेतल्याची टीका हिजबुल्लाहने केली. याआधी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, सौदी अरेबिया, युएई अशा २३ देशांनी हिजबुल्लाहवर संपूर्ण बंदी टाकली होती.

leave a reply