खुल्या, मुक्त व सुरक्षित इंडो-पॅसिफिकसाठी भारतासारख्या देशांबरोबरील सहकार्य वाढविणार

- ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्डस्

कॅनबेरा – खुल्या, सुरक्षित व सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी ऑस्ट्रेलिया भारतासारख्या समविचारी देशांशी सहकार्य वाढवेल, अशी ग्वाही ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्डस् यांनी दिली. हिंदी महासागर क्षेत्रात झालेला संयुक्त नौदल सराव भारतासारख्या सामरिक भागीदाराशी संबंध बळकट होत असल्याचे संकेत आहेत, याकडेही ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका ‘क्वाड’च्या माध्यमातून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांची मजबूत आघाडी उभारण्याच्या हालचाली करीत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया-जपान या देशांमधील संरक्षण सहकार्य दृढ होणे त्याचाच भाग असून, ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यानी त्याबाबत दिलेली ग्वाही महत्त्वाची ठरते.

खुल्या, मुक्त व सुरक्षित इंडो-पॅसिफिकसाठी भारतासारख्या देशांबरोबरील सहकार्य वाढविणार - ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्डस्गेल्याच आठवड्यात हिंदी महासागर क्षेत्रात भारत व ऑस्ट्रेलियाच्या नौदलामध्ये युद्धसराव पार पडला. या नौदल युद्धसरावात भारताच्या ‘आयएनएस सह्याद्री’ आणि ‘आयएनएस कर्मुक’ या विनाशिका तर ऑस्ट्रेलियन नौदलाची ‘एचएमएएस होबार्ट’ ही विनाशिका सहभागी झाली होती. चीनच्या विस्तारवादाविरोधात भारत व ऑस्ट्रेलिया एकत्र असल्याचा संदेश या सरावातून दिल्याचे मानले जाते. दोन दिवसांपूर्वीच चीन व ऑस्ट्रेलियामध्ये व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्याचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

खुल्या, मुक्त व सुरक्षित इंडो-पॅसिफिकसाठी भारतासारख्या देशांबरोबरील सहकार्य वाढविणार - ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्डस्‘काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया व भारताच्या पंतप्रधानांची व्हर्च्युअल बैठक पार पडली. हा दोन देशांच्या संरक्षण सहकार्यातील ऐतिहासिक क्षण होता. भविष्यात ही भागीदारी अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, संरक्षणक्षमता मजबूत करण्यासाठी आता भारत व ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणदलांमध्ये योग्य चौकट प्रस्थापित झाली आहे’, असे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्डस् यांनी सांगितले.

जून महिन्यात, भारत व ऑस्ट्रेलियामध्ये ‘म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट एग्रीमेंट’ (एमएलएसए) या संरक्षण करारासह सात सहकार्य करार झाले होते. त्याचवेळी इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी दोन्ही देशांनी आपल्या कृतिशील सहकार्याचा आराखडाही घोषित केला होता. त्यानंतर भारताने वर्षअखेरीस होणाऱ्या मलाबार युद्धसरावासाठी ऑस्ट्रेलियाला सहभागी होण्याचा प्रस्तावही दिला आहे. काही दिवसांपूर्वी भारत व ऑस्ट्रेलियाने जपानच्या सहकार्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्वतंत्र व्यापारी नेटवर्क उभारण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती देण्यात आली होती.

leave a reply