अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया-चीनदरम्यान व्यापारयुद्ध भडकण्याचे संकेत

कॅनबेरा/बीजिंग – अमेरिका चीनविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेत मिळत असतानाच, ऑस्ट्रेलिया व चीनदरम्यान नवे व्यापारयुद्ध भडकण्याचे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत. गेल्या काही महिन्यात चीनकडून ऑस्ट्रेलियाला देण्यात येणाऱ्या धमक्या व आयातीवर टाकलेले निर्बंध आणि त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून सातत्याने घेण्यात येणारी आक्रमक भूमिका या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतील, असे विश्लेषकांनी बजावले आहे. सध्या ऑस्ट्रेलिया व चीनमधील द्विपक्षीय व्यापार २३५ अब्ज डॉलर्सहून अधिक असून चीनला व्यापायुद्धाचा जास्त फटका बसेल, असा दावा ऑस्ट्रेलियन विश्लेषकांनी केला.

व्यापारयुद्ध

२०१५ साली ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये मुक्त व्यापारी करार झाला होता. ही घटना दोन देशांमधील आर्थिक व व्यापारी सहकार्यातील सर्वोच्च बिंदू मानला जातो. त्यावेळी दोन देशांमधील व्यापार १०० अब्ज डॉलर्सहुन अधिक होता. पुढील चार वर्षात हा व्यापार दुपटीहून अधिक वाढल्याचे दिसत असले तरी दोन्ही देशांमधील संबंधाना मात्र उतरती कळा लागण्यास सुरुवात झाल्याकडे ऑस्ट्रेलियन अभ्यासगटांनी लक्ष वेधले. २०१७ साली ऑस्ट्रेलियातील चीनच्या हस्तक्षेपाचा मुद्दा ठळकपणे समोर आला. त्यानंतर एकामागोमाग एक चीनच्या ऑस्ट्रेलियातील कारवाया समोर येऊ लागल्या.

ऑस्ट्रेलियासाठी मोठी बाजारपेठ असणाऱ्या चीनला, ऑस्ट्रेलियन सरकार व्यापारी संबंध टिकविण्यासाठी कारवाई करणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियन नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेने चीनची कोंडी झाली. पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांच्या नेतृत्वाखाली, ऑस्ट्रेलियाने गेल्या दीड वर्षात चीनविरोधातील आपली भूमिका अधिकाधिक आक्रमक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. मॉरिसन यांच्या सरकारने आपल्या देशावरील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यात चीनची ऑस्ट्रेलियातील गुंतवणूक व राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांचा समावेश आहे. ५जी क्षेत्रात चीनच्या हुवेई कंपनीवर बंदी घालणाऱ्या ऑस्ट्रेलियाने, चीनचा पॅसिफिक क्षेत्रातील प्रभाव रोखण्यासाठी स्वतंत्र धोरणही जाहीर केले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने घेतलेली भूमिका यात भर टाकणारी ठरली. या प्रकरणावरून चीनने ऑस्ट्रेलियाला परिणामांची धमकीही दिली होती. त्यानंतर चीनने ऑस्ट्रेलियाच्या उत्पादनांवर ८० टक्क्यांहून अधिक कर लादले. त्यानंतर चिनी जनता ऑस्ट्रेलियन उत्पादनांवर बहिष्कार टाकेल, असा इशाराही देण्यात आला. हा घटनाक्रम ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये व्यापारयुद्ध भडकण्याचे संकेत ठरतात, असा दावा ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजीक पॉलिसी इन्स्टिट्यूट’ व ‘चायना मॅटर्स’ या गटांनी केला आहे.

leave a reply