‘युएई’नंतर बहारिनचा इस्रायलसोबत द्विपक्षीय सहकार्य करार

वॉशिंग्टन – ‘संयुक्त अरब अमिरात’नंतर (युएई) बहारिनने देखील इस्रायलसोबत संबंध सुरळीत करण्याची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि बहारिनमधील या द्विपक्षीय सहकार्याची माहिती दिली. ‘आखातातील शांतीसाठी हा एक ऐतिहासिक दिवस असून इतर अरब देशही असाच निर्णय घेतील’, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केला. बहारिन हा इस्रायलसोबत द्विपक्षीय सहकार्य प्रस्थापित करणारा चौथा अरब देश ठरला आहे. २९ दिवसांपूर्वी ‘युएई’ने इस्रायलशी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित केले होते. दरम्यान, जगभरातून याचे स्वागत होत असताना, बहारिनचा हा निर्णय पॅलेस्टिनीच्या पाठीत खंजीर खुपसणारा असल्याची टीका पॅलेस्टाईन, इराण, तुर्कीने केली आहे.

‘युएई’नंतर बहारिनचा इस्रायलसोबत द्विपक्षीय सहकार्य करारअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि बहारिनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करुन इस्रायल-बहारिनमधील द्विपक्षीय सहकार्याची माहिती जाहीर केली. ‘आखातातील शांततेसाठी ही एक ऐतिहासिक घटना असून या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्य प्रस्थापित झाल्याने आखातात सकारात्मक बदल होतील. या क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल’, असे या निवेदनात म्हटले आहे. या द्विपक्षीय सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी, सुरक्षा आणि अन्य संबंध सुरळीत होतील, असा दावा केला जातो.

साधारण महिनाभरापूर्वी इस्रायल आणि ‘युएई’मध्ये द्विपक्षीय सहकार्य प्रस्थापित झाले असून येत्या मंगळवारी संबंधित करारावर स्वाक्षरी करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू आणि ‘युएई’चे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झईद अल-नह्यान अमेरिकेत उपस्थित असतील. यावेळी बहारिनचे परराष्ट्रमंत्री अब्दुललतिफ अल-झयानी हे देखील इस्रायलबरोबरील करारावर स्वाक्षरी करतील. काही दिवसांपूर्वीच बहारिनने इस्रायलच्या विमानांसाठी आपली हवाईसीमा मोकळी केली होती. बहारिन पाठोपाठ ओमान देखील इस्रायलशी द्विपक्षीय सहकार्य प्रस्थापित करू शकतो, असे दावे अमेरिकी माध्यमांकडून केले जात आहेत. तर युएई आणि आता त्यापाठोपाठ बहारिनने देखील इस्रायलबरोबर संबंध सुरळीत केल्याने सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘युएई’नंतर बहारिनचा इस्रायलसोबत द्विपक्षीय सहकार्य करारब्रिटन, ऑस्ट्रेलियासह युएई, इजिप्त, जॉर्डन या देशांनी सदर सहकार्याचे स्वागत केले. तर सौदी अरेबियाने इस्रायल-बहारिनमधील द्विपक्षीय सहकार्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पण सौदीच्या परवानगीशिवाय बहारिन हे पाऊल उचलू शकत नसल्याचा दावा आखातातील विश्लेषक करीत आहेत. युएई प्रमाणे बहारिनने इस्रायलबरोबर केलेल्या या द्विपक्षीय सहकार्याला सौदीचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. पण एकापाठोपाठ एक अरब देश इस्रायलबरोबर संबंध सुरळीत करीत चालल्यामुळे पॅलेस्टाईनमधील फताह आणि हमासने संताप व्यक्त केला आहे. या द्विपक्षीय सहकार्याबरोबर बहारिनने पॅलेस्टिनींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप पॅलेस्टिनी सरकारने केला आहे. तर हे द्विपक्षीय सहकार्य म्हणजे पॅलेस्टाईनच्याविरोधातील आक्रमण असून यामुळे पॅलेस्टाईनच्या मोहिमेला हादरा बसणार असल्याचा दावा हमासने केला.

तर हा करार करुन बहारिन देखील इस्रायलच्या गुन्ह्यांचा भागीदार बनल्याची टीका इराणने केली. या द्विपक्षीय सहकार्याबरोबर बहारिनने सर्वात मोठा विश्वासघात केल्याची टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. तुर्कीने देखील इस्रायल-बहारिनमधील या द्विपक्षीय सहकार्यावर ताशेरे ओढले आहेत. इस्रायलशी जुळवून बहारिनने स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मोहिमेला मोठा धक्का दिल्याचा आरोप तुर्कीने केला. या करारामुळे इस्रायलचा पॅलेस्टाईनवरील ताबा कायमस्वरुपी होईल, असा दावा तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. याआधीही इराण व तुर्कीने इस्रायल-युएई द्विपक्षीय सहकार्यावर टीका केली होती.

leave a reply