भारत-अमेरिका ‘टू प्लस टू’ बैठकीत ‘क्वाड’च्या मजबुतीवर चर्चा

नवी दिल्ली/वॉशिंग्टन – चीनबरोबरील तणाव अद्याप कायम असतानाच शुक्रवारी भारत व अमेरिकेदरम्यान ‘टू प्लस टू’ स्तरावरील बैठक पार पडली. त्यात द्विपक्षीय संरक्षण व सुरक्षाविषयक सहकार्याबरोबरच इंडो-पॅसिफिकमधील घडामोडी तसेच ‘क्वाड’ला अधिक गती देण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रान्सला क्वाडमध्ये सहभागी करून घेण्यासाठी बोलणी सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, भारत-अमेरिका चर्चेत इंडो-पॅसिफिकसह ‘क्वाड’च्या मुद्याला देण्यात आलेले प्राधान्य महत्वाचे ठरते.

भारत-अमेरिका 'टू प्लस टू' बैठकीत 'क्वाड'च्या मजबुतीवर चर्चागेल्याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी, ‘क्वाड’ला अधिक गती देण्यासाठी अमेरिका सक्रिय होत असल्याचे संकेत दिले होते. ओब्रायन यांच्यासह परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ ‘क्वाड’ सदस्य देशांमधील सहकाऱ्यांशी बोलणी करणार आहेत. इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या कारवायांना रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या या गटात भारताने अधिक योगदान द्यावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्यामुळे अमेरिका भारताबरोबरील विविध बैठकांमध्ये सातत्याने ‘क्वाड’च्या मुद्यावर भर देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकित त्यावर दिलेला भर त्याचेच संकेत मानले जातात.

शुक्रवारी झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत भारताकडून परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वाणी राव व संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोमनाथ घोष सहभागी झाले होते. तर अमेरिकेकडून परराष्ट्र विभागाच्या ‘ब्युरो ऑफ साऊथ अँड सेंट्रल एशियन अफेअर्स’चे डीन थोम्पसन व संरक्षण विभागाचे ‘इंडो-पॅसिफिक सिक्युरिटी अफेअर्स’चे डेव्हिड हेल्वे उपस्थित होते. डिसेंबर २०१९ मध्ये भारत व अमेरिकेदरम्यान मंत्रीस्तरावरील ‘टू प्लस टू’ बैठक पार पडली होती. त्यावेळी चर्चा झालेल्या मुद्यांच्या प्रगतीची माहिती यावेळी घेण्यात आल्याचे परराष्ट्र विभागाच्या निवेदनात सांगण्यात आले. निवेदनात ‘यूएस-इंडिया कॉम्प्रेहेंसिव्ह ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चाही उल्लेख करण्यात आला असून, दोन देशांमधील जवळीक वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या निवेदनात भारताचा ‘मेजर डिफेन्स पार्टनर’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्याचवेळी चीनचे थेट नाव न घेता दक्षिण आशियात अस्थैर्य निर्माण करणाऱ्या घटना व त्याला देण्यात आलेल्या प्रत्युत्तराची नोंद घेण्यात आली आहे. भारताबरोबर झालेल्या बैठकीत कोरोनाव्हायरस तसेच दहशतवादविरोधी मोहिमेसारख्या मुद्यांवर चर्चा झाल्याचेही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे.

२००७ साली जपानच्या पुढाकाराने झालेल्या चार देशांच्या अनौपचारिक बैठकीला ‘क्वाड’ असे म्हटले गेले होते. २०१७ साली झालेल्या ‘आसियन’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘क्वाड’ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत चीनच्या साऊथ चायना सीमधील वाढत्या कारवाया रोखण्यासाठी ‘क्वाड’ सक्रिय करण्यावर एकमत झाले. त्यानंतर गेल्या तीन वर्षात हा गट चीनविरोधातील प्रमुख आघाडी म्हणून आकारास येत असून सदस्य देशांमध्ये सातत्याने होणाऱ्या बैठका त्याला दुजोरा देणाऱ्या ठरतात.

leave a reply