दिल्लीत ९० कोटी रूपयांचे हेरॉइन जप्त

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल युनिटने २३ किलो हेरॉईन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉइनची किंमत नव्वद कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेले हेरॉइन म्यानमारहून मणिपूरमार्गे देशाच्या छोट्या अमली पदार्थ तस्करांपर्यंत जात असल्याची माहिती मिळत आहे.

मागील काही दिवसात अंमली पदार्थ जप्तीची ही तिसरी मोठी कारवाई आहे. तसेच एका आठवड्यात दिल्लीत झालेली दुसरी मोठी कारवाई ठरते. तसेच काही महिन्यांपूर्वी हैद्राबाद, मुंबई, नवी मुंबईमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.

दिल्लीत ९० कोटी रूपयांचे हेरॉइन जप्तदिल्ली पोलिसांना काही अमली पदार्थ तस्कर दिल्लीतील मुकुंदपूर चौकात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर स्पेशल टीमने याठिकाणी सापळा रचला होता. एका वाहनातून येथे आलेल्या तीन तस्करांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. याच वाहनात २० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. चौकशीनंतर आणखी दोघांना तीन किलोचे हेरॉइनसह अटक करण्यात आली.

सुबोध दास, संजीव कुमार, नित्यानंद, उदय कुमार आणि राहुल हांडिक अशी पकडण्यात आलेल्या पाच तस्करांची नावे असून हे सर्व बिहार आणि आसामचे रहिवासी आहेत. गेल्या चार वर्षांपासून मणिपूरमार्गे हेरॉइनची तस्करी केली जात आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणात अटक केलेल्या पाचही जणांकडून या तस्कर नेटवर्क आणि त्यांच्या साथीदारांची माहिती मिळवत नाही.

गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सात जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून ४८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. अटक झालेल्यांमध्ये दोन परदेशी नागरिक होते. यातील एक आफ्रिकन तर दुसरी म्यानमारची महिला होती. याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय टोळीशी असल्याचे समोर आले होते. कुरिअर कंपनीद्वारे अमली पदार्थ भारतात पाठवित होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी एका कुरियर कंपनीकडून ९७० ग्रॅम हेरॉइनचे पार्सल जप्त केले होते.

leave a reply