उत्तर कोरियाकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

- संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेत अमेरिकेला इशारा

बॅलिस्टिकप्योनग्यँग/वॉशिंग्टन – मंगळवारी पहाटे उत्तर कोरियाने छोटा पल्ला असलेल्या ‘बॅलिस्टिक मिसाईल’ची चाचणी केल्याचे उघड झाले. या चाचणीनंतर काही तासातच संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासभेत अमेरिकेला इशाराही देण्यात आला. उत्तर कोरियाला आपल्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची शस्त्रे विकसित करण्याचा हक्क आहे, असे उत्तर कोरियाचे राजदूत किम सॉंग यांनी बजावले. अमेरिकेने आपले शत्रुत्त्वाचे धोरण सोडावे, असेही सॉंग यांनी आपल्या इशार्‍यात म्हटले आहे. मंगळवारी केलेली चाचणी ही उत्तर कोरियाने या महिन्यात केलेली तिसरी क्षेपणास्त्र चाचणी ठरली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी अवघ्या पाच दिवसांच्या अवधीत उत्तर कोरियाने दोन क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या होत्या. ११ व १२ सप्टेंबरला आण्विक क्षमता असणार्‍या दीर्घ पल्ल्याच्या ‘क्रूझ’ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. तर त्यानंतर बुधवारी १५ सप्टेंबरला दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या होत्या. अमेरिका, दक्षिण कोरिया व जपान हे देश उत्तर कोरियाशी पुन्हा शांतीचर्चा सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहेत. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन देशांमधील युद्धाची अधिकृतरित्या अखेर व्हायला हवी, असाही प्रस्ताव दिला होता. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व इतर देशांवर दडपण आणण्यासाठी उत्तर कोरिया चाचण्यांचा वापर करीत असल्याचे सांगण्यात येते.

बॅलिस्टिकमंगळवारी केलेली चाचणीही त्याचाच भाग दिसत आहे. पहाटे सहाच्या सुमारास जगांग प्रांतातून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडण्यात आले. ‘सी ऑफ जपान’च्या दिशेने सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने सुमारे १२५ मैलांचा पल्ला गाठल्याचे सांगण्यात येते. चाचणीदरम्यान क्षेपणास्त्र सुमारे २० मैलांच्या उंचीवर गेले होते, असेही दक्षिण कोरियातील सूत्रांनी सांगितले. जपान सरकारने हे क्षेपणास्त्र बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याची माहिती दिली आहे. तर अमेरिका व दक्षिण कोरियाने चाचणीची पूर्ण माहिती घेण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने चाचणीवर टीका केली आहे. ‘उत्तर कोरियाने केलेली चाचणी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अनेक ठरावांचा भंग ठरतो. ही चाचणी उत्तर कोरियाच्या शेजारी देशांसह आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोका आहे’, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र विभागाने दिली. त्याचवेळी उत्तर कोरियाबरोबर राजनैतिक पातळीवर चर्चा करण्यास आम्ही वचनबद्ध असून, त्यांनीही वाटाघाटींसाठी तयार व्हावे, असे आवाहनही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र उत्तर कोरियाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासभेतील बॅलिस्टिकवक्तव्यावरून समोर आले.

‘उत्तर कोरियाला स्वसंरक्षणाचा व त्यासाठी शस्त्रास्त्रे विकसित करण्याचा अधिकार आहे. आम्ही आमची संरक्षण यंत्रणा उभारत आहोत. देशातील शांतता कायम रहावी, तसेच आमचा बचाव व्हावा यासाठी आम्ही यापुढेही शस्त्रे विकसित करु’, असा इशारा संयुक्त राष्ट्रातील उत्तर कोरियाचे राजदूत किम सॉंग यांनी दिला. अमेरिकेने आपले शत्रुत्त्वाचे धोरण सोडले तर उत्तर कोरिया त्याला प्रतिसाद देईल, मात्र सध्या तरी त्याची शक्यता दिसत नाही, असेही सॉंग यांनी पुढे बजावले.

मार्च महिन्यात उत्तर कोरियाने छोट्या पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांच्या तसेच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर उत्तर कोरियाकडून आण्विक हालचालींमध्ये वाढ झाल्याचा अहवालही अमेरिकी अभ्यासगटाने प्रसिद्ध केला होता. गेल्याच महिन्यात, ‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक’ची क्षमता अधिक वाढविण्याचा इशाराही उत्तर कोरियाकडून देण्यात आला होता.

leave a reply