आयएस-खोरासनच्या नेत्याला ठार केल्याचा तालिबानचा दावा

आयएस-खोरासनकाबुल – अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला आव्हान देणार्‍या ‘आयएस-खोरासन’चा माजी प्रमुख अबु ओमर खोरासनी याला ठार केल्याचे तालिबानने जाहीर केले. काबुलचा ताबा घेतल्यानंतर पुढच्या दोन दिवसातच खोरासनीला संपविल्याचा दावा तालिबानने केला. गेल्या काही दिवसांपासून आयएस-खोरासनचे दहशतवादी तालिबानला लक्ष्य करीत असून दोन्ही दहशतवादी संघटनांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता वर्तविली जाते. अशावेळी तालिबानने खोरासनीला ठार केल्याची बातमी प्रसिद्ध करून आयएसला चिथावणी दिली आहे.

अबु ओमर खोरासनी उर्फ झिया-उल-हक हा २०१८ ते २०१९ या काळात अफगाणिस्तानातील आयएस-खोरासनचा प्रमुख होता. पाकिस्तानच्या सीमेजवळील कुनार प्रांतात खोरासनीचा तळ होता. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानात केलेल्या कारवाईत खोरासनीला अटक करून काबुल येथील पुल-ए-चरखी या सर्वात मोठ्या तुरुंगात डांबले होते.

गेल्या महिन्यात तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर बगरामसह पुल-ए-चरखी, हेल्मंड, कंदहारमधील सर्व तुरुंगात कैद केलेल्या दहशतवाद्यांची सुटका केली होती. यामध्ये तालिबानसह तेहरिक-ए-तालिबान तसेच आयएसच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. तालिबानने मोस्ट वॉंटेड दहशतवाद्यांची सुटका केल्यामुळे पाकिस्तानसह जगभरातील विश्‍लेषकांनी चिंता व्यक्त केली होती.

पण हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या लेबेनीज वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजीच तालिबानने खोरासनी व त्याच्या साथीदारांना ठार केले. खोरासनीला मारल्याची माहिती उघड झाली तर आयएसकडून मोठी प्रतिक्रिया येऊ शकते, या भीतीने तालिबानने ही बातमी उघड केली नव्हती.

आयएस-खोरासनपण पुढच्या काही दिवसातच आयएसच्या दहशतवाद्यांनी काबुल विमानतळाजवळ मोठा घातपात घडविला. यात १७० हून अधिक जणांचा बळी गेला. तर गेल्या काही दिवसांपासून काबुलसह जलालाबाद, मझार-ए-शरीफ येथील तालिबानच्या वाहनांवरील आयएसच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अफगाणिस्तानात आयएसचा प्रभाव नसल्याचा दावा तालिबान करीत आहे. पण जलालाबादमधील हल्ल्यांनंतर तालिबान आणि आयएस यांच्यात येत्या काळात मोठा संघर्ष पेटेल, असा दावा आखाती माध्यमे व विश्‍लेषक करीत आहेत. गेल्या महिन्याभरात तालिबानने आयएसच्या तीन मोठ्या नेत्यांना ठार केले आहे. पाकिस्तानातील आयएसचा नेता फारुक बेंगलाझी तर अबु ओबेदुल्ला मुतलाकी याला ठार केले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानातील आयएसच्या विचारधारेला प्रोत्साहन देणारे तीसहून अधिक प्रार्थनास्थळे बंद केली आहेत. पण यामुळे आयएसच्या हालचाली थांबलेल्या नाहीत, असे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक बजावत आहेत.

पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या नांगरहार, कुनार प्रांतात आयएसचा मोठा प्रभाव आहे. पण तालिबान भ्रष्ट बनली असून तालिबानने सत्तेसाठी अमेरिकेशी हातमिळवणी केल्याचे आरोप आयएसचे नेते करीत आहेत. त्यामुळे तालिबानवर नाराज झालेले कट्टरपंथी आयएसला सामील होण्याची दाट शक्यता समोर येत आहे. याआधी असे प्रकार घडले होते, हे विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात अफगाणिस्तानात तालिबान व आयएसमध्ये जोरदार संघर्ष पेटणार असल्याचे दिसत आहे.

leave a reply