नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढाई निर्णायक टप्प्यावर

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

जगदलपूर – ‘छत्तीसगडच्या बिजापूर येथील जंगलामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २२ जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचे कृतज्ञतापूर्ण स्मरण कायम राहिल. त्याचवेळी नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढाई अधिकच तीव्र केली जाईल’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. छत्तीसगडच्या बस्तरला भेट देऊन केंद्रीय गृहमंत्र्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या चकमकीत जखमी झालेल्या जवानांची गृहमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

शनिवारी दुपारी छत्तीसगडच्या बिजापूर येथील जंगलामध्ये गस्त घालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला चढविला होता. या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले आहेत. तर या हल्ल्यात ३१ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. गृहमंत्री अमित शहा यांनी आपले सारे कार्यक्रम रद्द करून सुरक्षाविषयक बैठकीचे आयोजन केले. सोमवारी छत्तीसगडच्या बस्तरला भेट देऊन गृहमंत्र्यांनी सीआरपीएफच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते.

केंद्र व छत्तीसगडचे राज्य सरकार नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढाई अधिकच तीव्र करील, असे सांगून अमित शहा यांनी ही लढाई अखेरपर्यंत थांबणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आहे, असेही शहा पुढे म्हणाले. या लढाईत आपण आपले २२ सहकारी गमावले असले तरी त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. उलट त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढाई अधिक पुढे नेली जाईल, असे शहा यांनी म्हटले आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या भागात सुरक्षा दलांनी आपले तळ उभारले आहेत. याचा फार मोठा धक्का नक्षलवाद्यांना बसलेला आहे. यामुळे आलेल्या वैफल्यातूनच नक्षलवाद्यांनी हा हल्ला चढविला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी दिली. मात्र पुढच्या काळात नक्षलवाद्यांच्या विरोधात केंद्र व राज्यसरकार अधिक कठोरतेने कारवाई करील, अशी खात्री बाळगा, असे गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले.

नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून हिंसेचा मार्ग सोडला, तर त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणले जाईल, असे संकेतही यावेळी गृहमंत्र्यांनी दिले. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या ठिकाणांमध्ये फार मोठी घट झाल्याचे समोर येत आहे. त्याचवेळी दिशाभूल करून नक्षलवाद्यांनी आपल्या गटात समील करून घेतलेल्या तरुणांचा भ्रमनिरास झाल्याने, ते शरणांगती पत्करत असल्याचेही उघड झाले होते. याचा फार मोठा परिणाम दिसू लागला असून नक्षलवाद्यांचे बळ खूपच कमी झालाचा दावा केला जातो.

नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या अखेरच्या क्षेत्रांमध्येही सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या कारवाया प्रभावी ठरू लागल्याचे दिसत आहे. यामुळे वैफल्यग्रस्त बनलेले नक्षलवादी सुरक्षा दलांना लक्ष्य करणारे हल्ले चढवित असल्याचे सीआरपीएफच्या महासंचालकांनी सोमवारी म्हटले होेते.

leave a reply