मिन्स्क/बीजिंग – देशात सुरु असणारे लोकशाहीवादी आंदोलन मोडून काढण्यासाठी रशियाला हाक देणाऱ्या बेलारुसने आर्थिक हितसंबंधांसाठी चीनशी हातमिळवणी केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने बेलारुसला ६० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्यास नकार दिला होता. रशियाच्या या नकारानंतर बेलारुसने चीनला विनंती करून ५० कोटी डॉलर्स कर्ज घेण्यात यश मिळविल्याची माहिती उघड झाली आहे. रशियाने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी बेलारुसमधील चीनच्या हस्तक्षेपामुळे रशिया व चीनमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.
बेलारुसमध्ये दीड महिने राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. निदर्शनांच्या माध्यमातून आपल्या राजवटीला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडे याचना केली होती. बेलारुसबरोबर काही मुद्यांवर तणाव असतानाही पुतिन यांनी लुकाशेन्को यांना मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरविले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही रशियाने अमेरिका व युरोपिय देशांनी बेलारुसमध्ये हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट बजावले होते. या पार्श्वभूमीवर, रशियाने नाकारलेले आर्थिक सहाय्य पुरवून चीनने बेलारुसच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप केल्याचे दिसत आहे.
चीनच्या सत्ताधारी राजवटीचा उपक्रम असणाऱ्या ‘चायना डेव्हलपमेंट बँके’ने बेलारुसला ५० कोटी डॉलर्सचे कर्ज दिले आहे. बेलारुसचे अर्थमंत्री मकासीम यर्मालोविच यांनी, चीनशी कर्जाबाबत करार केल्याची माहिती दिली. या करारातून बेलारुसच्या राजवटीने ते पैशासाठी पूर्णपणे रशियावर अवलंबून नसल्याचा संदेश दिला असून त्यावर रशियाकडून प्रतिक्रिया उमटू शकते, असा दावा रशियन विश्लेषक करीत आहेत. बेलारुसने गेल्या काही वर्षांत चीनबरोबर जवळीक वाढविण्याचे प्रयत्न केले होते, याकडेही रशियन विश्लेषक लक्ष वेधीत आहेत. दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार ३.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.
रशिया व युक्रेननंतर चीन हा बेलारुसचा तिसरा मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. या वाढत्या सहकार्याकडे रशिया दुर्लक्ष करणे शक्य नाही. बेलारुसला रशियाचा हिस्सा बनविण्याची पुतिन यांची महत्त्वाकांक्षा आहे. चीन-बेलारुस यांच्यातील जवळीक त्यात अडथळा ठरु शकते. त्यामुळे बेलारुसबरोबरच रशिया चीनकडेही आपली नाराजी व्यक्त करेल, असे रशियन विश्लेषकांचे म्हणणे आहे.