पोलंड व युक्रेनच्या सीमेनजिक बेलारुसचा लष्करी सराव

सरावमिन्स्क – रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असतानाच रशियाचा मित्रदेश असणाऱ्या बेलारुसने नव्या लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. हा सराव पोलंड व युक्रेन या दोन देशांच्या सीमेनजिक आयोजित करण्यात आला आहे. शत्रूने ताब्यात घेतलेला भाग सोडविणे व सीमांवर नियंत्रण प्रस्थापित करणे या सरावाचा उद्देश असल्याचे बेलारुसच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. सरावाला सुरुवात होत असतानाच, रशियविरोधात युद्धाला तोंड फुटण्याचा धोका वाढल्याचा इशारा पोलंडच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यापासून बेलारुसने रशियाच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली आहे. रशियाने युक्रेनवरील कारवाईसाठी बेलारुसमध्ये काही लष्करी तुकड्या तैनात केल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी आपली लढाऊ विमाने अण्वस्त्रहल्ल्यांसाठी सज्ज करण्यात आल्याचा दावाही बेलारुसने केला होता. रशियाला सहाय्य करण्यासाठी संरक्षणदले सज्ज असल्याची ग्वाही बेलारुसच्या नेत्यांकडून वारंवार देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नवा लष्करी सराव लक्ष वेधून घेणारा ठरतो. नव्या सरावात बेलारुसचे साडेसात हजार जवान, ३०हून अधिक लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स आणि अडीचशेहून जास्त सशस्त्र वाहने सहभागी झाली आहेत.

बेलारुसमधील सरावाला सुरुवात होत असतानाच पोलंडच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी रशियाविरोधातील युद्धाचा धोका वाढल्याचा इशारा दिला. येत्या तीन ते दहा वर्षात रशिया-पोलंड युद्धाचा भडका उडू शकतो, असे उपसंरक्षणमंत्री मार्सिन ओसिपा यांनी बजावले. या युद्धासाठी पोलंडला जोरदार तयारी करणे भाग असून अधिकाधिक शस्त्रसाठा व संरक्षणयंत्रणा मिळवणे आवश्यक ठरते, असे ओसिपा यांनी म्हटले आहे. रशियाला पूर्वीप्रमाणे संरक्षणक्षमता मिळविण्यास किती काळ लागतो यावर सर्व अवलंबून आहे, असा दावाही त्यांनी केला.

leave a reply