आर्थिक मंदीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर युरोपिअन सेंट्र्ल बँकेकडून व्याजदरात पाऊण टक्क्यांची अभूतपूर्व वाढ

Macroeconomic-Influencersब्रुसेल्स – महागाईचा भडका व घटती उत्पादनक्षमता यामुळे युरोप खंडाला आर्थिक मंदीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंदीचा हा धोका असतानाही युरोपिय महासंघाची मध्यवर्ती बँक असणाऱ्या ‘युरोपिअन सेंट्र्ल बँके’ने व्याजदरात पाऊण टक्क्यांची अभूतपूर्व वाढ केली आहे. त्यामुळे युरोपिय महासंघातील व्याजदर आता ०.७५ टक्क्यांपर्यंत गेला आहे. या व्याजदरवाढीचे पडसाद युरोपिय शेअरबाजारांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली असून आघाडीच्या निर्देशांकांमध्ये पडझड सुरू झाल्याचे वृत्त आहे.

ecbकोरोनाची साथ, जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी व रशिया-युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम युरोपिय अर्थव्यवस्थेवर होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना व पुरवठा साखळीतील संकटातून बाहेर पडण्यासाठी महासंघाने मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य घोषित केले होते. त्यामुळे अर्थव्यवस्था सावरेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला होता. मात्र रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिघडण्यास सुरुवात झाली आहे.

रशियावर टाकलेले निर्बंध व इंधनपुरवठा रोखून रशियाने त्याला दिलेले प्रत्युत्तर यामुळे युरोपात इंधन व वीजेचे दर विक्रमी पातळीपर्यंत कडाडले आहेत. इंधनाचे दर भडकल्यामुळे इतर उत्पादनांवरही परिणाम झाला असून युरोपातील महागाई निर्देशांक नऊ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील काळात यात अधिक भर पडण्याची शक्यता असून युरोपियन जनतेवर इंधन तसेच वीजेचे रेशनिंग करण्याची वेळ ओढविली आहे. पुरेसे इंधन उपलब्ध न झाल्यास युरोपमधील काही भाग गोठण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे.

European Central Bankया सर्वांचा परिणाम युरोपिय अर्थव्यवस्थेवर दिसू लागला असून जर्मनी, फ्रान्स व इटलीसारख्या आघाडीच्या अर्थव्यवस्था मंदावू लागल्या आहेत. या देशांमधील उत्पादन तसेच सेवा क्षेत्राला मोठे फटके बसले असून या क्षेत्रातील निर्देशांक नीचांकी पातळीपर्यंत घसरले आहेत. जर्मन अर्थव्यवस्था या तिमाहिपासून मंदीत जाईल, असे स्पष्ट संकेत या देशातील सरकारी यंत्रणांसह अर्थतज्ज्ञांनी दिले आहेत. अमेरिका व इतर देशातील विश्लेषक तसेच वित्तसंस्थांनीही त्याला दुजोरा दिला. जर्मनी ही आघाडीची युरोपिय अर्थव्यवस्था असल्याने त्याचे पडसाद युरोपातील इतर देशांमध्ये उमटतील, असे सांगण्यात येते.

युरोपमधील या संभाव्य मंदीच्या पार्श्वभूमीवर युरोपिअन सेंट्र्ल बँकेने व्याजदरात केलेली वाढ लक्ष वेधून घेणारी ठरते. युरोपिय देशांमधील वाढत्या महागाईला रोखण्यासाठी ही वाढ करण्यात येत असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. व्याजदरापाठोपाठ ‘रिफायनान्सिंग’साठीच्या दरांमध्येही वाढ करण्यात आली असून ते १.२५ टक्के करण्यात आले आहेत. हा २०११ सालानंतरचा सर्वोच्च व्याजदर ठरतो. ही वाढ सुरुवात असून पुढील काही महिन्यांमध्ये व्याजदर अधिक वाढविले जातील, असे बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

leave a reply