बायडेन प्रशासन पाकिस्तानबरोबरील संबंधांवर फेरविचार करीत आहे

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील अपयशासाठी अमेरिका पाकिस्तानला जबाबदार धरणार असून अमेरिकेची वक्रदृष्टी पाकिस्तानकडे वळलेली आहे, असे परखड पाकिस्तानातील काही पत्रकारांनी दिले होते. हे इशारे प्रत्यक्षात उतरू लागल्याचे संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या मानहानीकारक माघारीनंतर संतापलेल्या अमेरिकी संसद सदस्यांसमोर बोलताना, परराष्ट्रमंत्री ऍन्थनी ब्लिंकन यांनी गेल्या वीस वर्षात तालिबानसह हक्कानी नेटवर्कला आश्रय देऊन पाकिस्तान आपला डाव खेळत आल्याची कबुलीही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. अफगाणिस्तानात अमेरिका व पाकिस्तानचे हितसंबंध परस्परविरोधी असल्याची कबुली देऊन बायडेन प्रशासन पाकिस्तानबरोबरील संबंधांवर फेरविचार करीत असल्याचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

सोमवारी अमेरिकन संसदेत परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करण्यात आला. तालिबान व तालिबानच्या नेत्यांना कित्येक वर्षांपासून आश्रय देणार्‍या पाकिस्तानबरोबरील संबंधांवर अमेरिकेने फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे का? असा प्रश्‍न एका अमेरिकी कॉंग्रेसच्या सदस्याने केला. त्याला होकारार्थी उत्तर देऊन गेल्या वीस वर्षांपासून पाकिस्तानने तालिबानसह हक्कानी नेटवर्कला संरक्षण पुरविल्याचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी मान्य केले. इतकेच नाही तर अफगाणिस्तानात पाकिस्तानचे बरेच हितसंबंध गुंतलेले आहेत, असे सांगून हा देश अफगाणिस्तानात आपले डाव खेळत असल्याचा दावा ब्लिंकन यांनी केला.

अमेरिका व पाकिस्तानचे अफगाणिस्तानातील हितसंबंध परस्परविरोधी आहेत, असे लक्षवेधी विधान यावेळी परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केेले. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका पाकिस्तानच्या कारवायांकडे अत्यंत बारकाईने पाहत असल्याचे सांगून ब्लिंकन यांनी पाकिस्तानबरोबरील संबंधांचे पुनरावलोकन केले जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी घणाघाती टीका करण्याचे टाळून ब्लिंकन यांनी पाकिस्तानला इशारा देण्यापुरती आपली विधाने मर्यादित ठेवल्याचे दिसत आहे. पण अमेरिकन संसदेच्या सदस्यांनी मात्र ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात छेडलेल्या दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर जळजळीत टीका केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान?खान यांनी तालिबानने अफगाणिस्तानच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकल्याची विधाने केली होती. हा मुद्दा अमेरिकी संसदेच्या सदस्यांनी उपस्थित केला. तसेच तालिबानचा गट असलेल्या हक्कानी नेटवर्क व पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संंघटना आयएसआयचे साटेलोटे आहे, याकडेही अमेरिकेचे संसद सदस्य बिल केटिंग यांनी लक्ष वेधले. हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात फार मोठ्या संख्येने बळी घेतले आणि त्यात अमेरिकेच्या सैनिकांचाही समावेश होता, ही बाब केटिंग यांनी लक्षात आणून दिली.

यातून अमेरिका काहीच धडा घेणार नाही का? असा सवाल केटिंग यांनी केला होता. तर कॉंग्रेसमन जोआक्विन कॅस्ट्रो यांनी अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले नॉन-नाटो अलायचा दर्जा काढून घेण्याची मागणी केली. दरम्यान, अमेरिकी संसदेच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीने अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या अपयशाला पाकिस्तानचा विश्‍वासघात कारणीभूत असल्याचा ठपका काही महिन्यांपूर्वी ठेवला होता. अशा विश्‍वासघातकी देशाला धडा शिकविण्याची मागणी अमेरिकन लोकप्रतिनिधी करीत आहेत. मात्र पाकिस्तानला धडा शिकविण्याच्या आधी, अमेरिकेने पाकिस्तानच्या विश्‍वासघातातून मिळालेला धडा घेतला आहे का? असा प्रश्‍न भारताच्या एका माजी लष्करी अधिकार्‍याने केला आहे.

अफगाणिस्तानातील पाकिस्तानच्या भूमिकेवर असंतोष व्यक्त करीत असताना, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताची अफगाणिस्तानातील भूमिका अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी काहीवेळेस उपकारक ठरल्याचे म्हटेल आहे. मात्र अजूनही तालिबान व हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी अफगाणिस्तानात घडवित असलेल्या हत्याकांडाला तसेच मानवाधिकारांच्या हननाला पाकिस्तान जबाबदार आहे, हे बायडेन प्रशासन उघडपणे मान्य करायला तयार नाही. विशेषतः अमेरिकी संसदेच्या सदस्यांचा, लष्करी व गुप्तचर विभागांच्या आजीमाजी अधिकार्‍यांचा व मुत्सद्यांचा पाकिस्तानवरील संताप आणि बायडेन प्रशासनाची पाकिस्तानवरील नाराजी यामध्ये फार मोठी तफावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पुढच्या काळात पाकिस्तानच्या बळावर सध्या तालिबानवर नियंत्रण असलेल्या हक्कानी नेटवर्कने अफगाणिस्तानात हाहाकार माजविला, तर त्याचा फटका बायडेन प्रशासनालाही बसू शकेल. कारण पाकिस्तानने अमेरिकेचा विश्‍वासघात करूनही, बायडेन प्रशासनाने याची किंमत पाकिस्तानला मोजायला लावणारी कारवाई अजूनही सुरू केलेली नाही.

leave a reply