भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट उघड

- महाराष्ट्र, दिल्ली व उत्तर प्रदेशातून सहा दहशतवाद्यांना अटक

  • दोघा दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण
  • आयएसआय आणि अनिस इब्राहिमचा हात

कटनवी दिल्ली – महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात मोठे दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट उधळण्यात आला आहे. सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या सहा पैकी दोन दहशतवाद्यांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होतेे. या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड होत आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जाते. कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमचे नावही समोर आले असून या दहशतवाद्यांना पाकिस्तानात नेऊन प्रशिक्षण देण्यासह शस्त्र व स्फोट पुरवठा इतर गोष्टीसाठी अनिस इब्राहिम फंडिंग करीत होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाला दहशतवाद्यांबद्दल काही माहिती मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलीस मिळणार्‍या सर्व माहितीची छाननी करीत विविध दूवे जुळविण्याचा गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करीत होते. याच दरम्यान मूळचा महाराष्ट्रातील समीर नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले. या समीर नावाच्या व्यक्तीला कोटामधून एका रेल्वेतून अटक करण्यात आल्याची माहिती, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे आयुक्त निरज ठाकूर यांनी दिली.

समीरच्या चौकशीत महाराष्ट्रातील जान मोहम्मद शेख या दहशतवाद्याची माहिती मिळाली. शेखला अटक करण्यात आल्यानंतर चौकशीतून बाहेर आलेल्या तपशीलाच्या आधारे व आधीपासून दिल्ली पोलिसांकडे असलेल्या माहितीची तपासणी करून दिल्लीतून ओसामा उर्फ सामी, मुलचंद उर्फ साजू या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेशातून तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. झिशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद अमिर जावेद अशी या तीन जणांची नावे आहेत.

या सहा दहशतवाद्यांपैकी ओसामा आणि कमर याने पाकिस्तानात जाऊन शस्त्रास्त्र व स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. हे दोघे पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी जाण्याआधी मस्कदला गेले होते. तेथून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले. मस्कदवरून त्यांना पाकिस्तानात नेत असताना त्यांच्याबरोबर काही बंगाली भाषिकही होते. कदाचित त्यांनाही अशाच प्रकारच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात आणले गेले असावे, अशी शक्यता स्पेशल सेलचे आयुक्त ठाकूर यांनी व्यक्त केली. हा कट व्यापक होता. शस्त्र पुरवठा व इतर गोष्टींसाठी टेरर फंडिंग दाऊदचा भाऊ अनिस करत होता. यासाठी दोन गट तयार करण्यात आले होते. यातील एक गट अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. तेच दुसर्‍या गटाला ही शस्त्र व स्फोटके लपवून ठेवण्याचे काम देण्यात आले होते, अशी माहितीही दिल्ली पोलिसांनी दिली.

ठिकाठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान एके-४७ सह मोठ्या प्रमाणावर शस्त्र व स्फोटकसाठा सापडला आहे. प्रयागराजमधून एक जिवंत आयईडीही पोलिसांनी हस्तगत केला. तो निकामी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सणासुदीत, उत्तर प्रदेशातील निवडणुकांआधी दहशतवादी हल्ले घडविण्याचा व राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट होता. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात हल्ले घडविण्याचे कारस्थान होते, असे पोलिसांनी म्हटले असून याबाबत अधिक तपशील देण्याचे टाळले आहे.

leave a reply