ट्रम्प यांचे बेकायदा निर्वासितांना रोखणारे ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रद्द केले – एक कोटींहून अधिक अवैध निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी नवे विधेयक सादर

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात घुसणार्‍या अवैध निर्वासितांना रोखण्यासाठी तयार केलेले ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रद्द केले आहे. यासंदर्भातील एक आदेश अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी अमेरिकेत राहणार्‍या एक कोटींहून अधिक बेकायदा निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी नवे विधेयकही संसदेत सादर केले आहे. काही महिन्यांपूर्वीच माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर निर्वासितांच्या त्सुनामी धडकत असल्याचा आरोप केला होता.

‘रिमेन इन मेक्सिको’माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत आलेल्या तसेच घुसखोरी करणार्‍या निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मेक्सिको सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी ‘मेक्सिको वॉल’च्या उभारणीबरोबरच ‘रिमेन इन मेक्सिको’सारखे धोरणही राबविले होते. त्यात मेक्सिकोतून अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांची प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना मेक्सिकोतच ठेवण्याच्या तरतुदीचा समावेश होता.

त्यामुळे बेकायदेशीररित्या अमेरिकेत येऊ पाहणारे हजारो निर्वासित मेक्सिकोतच अडकून पडले होते. या निर्वासितांविरोधात मेक्सिको सरकारलाही कारवाई करणे भाग पडले होते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती. मात्र बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. ट्रम्प यांचे निर्वासितांसंदर्भातील धोरण अमेरिकेला काळिमा फासणारे होते असा ठपकाही बायडेन यांनी ठेवला होता.

‘रिमेन इन मेक्सिको’ट्रम्प यांचे धोरण रद्द करण्याचा निर्णय बायडेन व डेमोक्रॅट पक्षाकडून निर्वासितांबाबत स्वीकारण्यात येणार्‍या सौम्य भूमिकेचा भाग आहे. याच सौम्य भूमिकेमुळे गेले काही महिने अमेरिकेत लाखो निर्वासितांचे लोंढे धडकले असून सीमेवरील राज्यांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचेही समोर आले आहे. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी निर्वासितांच्या लोंढ्यांना अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी अधिकच मोकळे रान दिल्याचे नव्या निर्णयावरून दिसून येते.

‘रिमेन इन मेक्सिको’घुसखोरी करणार्‍या निर्वासितांबरोबरच यापूर्वी अमेरिकेत येऊन अवैधरित्या राहणार्‍या निर्वासितांनाही बायडेन यांनी नवी भेट दिली आहे. जवळपास 1.1 कोटी अवैध निर्वासितांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यासाठी बायडेन यांनी ‘युएस सिटिझनशिप अ‍ॅक्ट ऑफ 2021’ नावाचे विधेयक सादर केले आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन निर्वासितांना मोकळीक देण्यात मग्न असतानाच मेक्सिको सीमेवरील टेक्सास राज्यातील परिस्थिती अधिकच बिघडत चालल्याचे समोर आले आहे. टेक्सासमधील सुरक्षायंत्रणांनी अवैध घुसखोरीविरोधात केलेल्या व्यापक कारवाईत 150 हून अधिक निर्वासितांना ताब्यात घेतले आहे. मानवी तस्करी करणार्‍या टोळ्यांच्या माध्यमातून या निर्वासितांना घुसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर, टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी राज्यात ‘आपत्ती’ची घोषणा केली आहे. निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे ही आपत्ती जाहीर करण्यात आली असून लोंढे रोखण्यासाठी अतिरिक्त प्रशासकीय सहाय्य उपलब्ध केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

leave a reply