सौदीबाबत बायडेन यांच्याकडून निक्सन प्रशासनाच्या चुकीची पुनरावृत्ती

अमेरिकी वर्तमानपत्राची टीका

वॉशिंग्टन – ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आखातातील अरब मित्रदेश अमेरिकेपासून दूरावल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करीत होते. गेल्या काही महिन्यांपासून तर इंधन उत्पादनाच्या कपातीवरून सौदी अरेबियाशी व्यवहार करताना राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या चुकीची पुनरावृत्ती केली आहे. बायडेन यांच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधनाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले तर त्याचा थेट परिणाम जागतिक राजकारण आणि आर्थिक स्थैर्यावर होईल.

biden nixonसौदीबाबतचे बायडेन यांचे धोरण रशियाला मोठे यश, तर अमेरिकेला अपयश देणारे ठरेल, असा इशारा या वर्तमानपत्राने केला. ५० वर्षांपूर्वी अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी इंधनाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौदी अरेबियाचा वापर केला होता. अमेरिकेबरोबरील सहकार्यासाठी सौदीने इराणच्या प्रभावाखाली असलेल्या ओपेकच्या विरोधात जाऊन १५ टक्के इंधनदरवाढीला विरोध केला होता. पण पुढच्या काही महिन्यांमध्येच निक्सन यांनी इराणमधील शाह पहेलवी यांच्या राजवटीला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा सुरू केला होता. यामुळे सौदी सावध झाला, याकडे ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या वर्तमानपत्राने लक्ष वेधले.

निक्सन यांनी सौदीबाबत केलेल्या याच चुका बायडेन नव्याने करीत असल्याची टीका सदर वर्तमानपत्राने केली. बायडेन यांनी सत्तेवर येताच इराणच्या मागण्या मान्य करून अणुकरारासाठी धडपड सुरू केली. तसेच पर्यायी इंधन अर्थात ग्रीन एनर्जीसाठी प्रयत्न सुरू करून सौदीच्या प्रभावाखाली असलेल्या ओपेकला हादरा देण्याचा प्रयत्न केला होता. तर बायडेन यांनी सौदीच्या राजवटीवर पातळी ओलांडून टीका केली होती. इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी सौदीच्या इंधन प्रकल्पांवर ड्रोन हल्ले चढविल्यानंतर बायडेन प्रशासनाने कारवाई केली नव्हती, याची नोंदही सौदीने घेतले आहे. बायडेन यांच्या या धोरणांमुळे सावध झालेल्या सौदीने रशियाजवळ चालल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने लक्षात आणून दिले.

गेली काही वर्षे अमेरिका परदेशी इंधनावर अवलंबून होता. २०१९ सालानंतर अमेरिका इंधन निर्यातदार देश बनला. पण बायडेन यांनी स्थानिक इंधन उत्पादकांना दडपून अजूनही न सापडलेल्या ग्रीन एनर्जीसाठी प्रयत्न केले. यामुळे अमेरिका पुन्हा एकदा इंधनाचा आयातदार देश बनल्याची आठवण या वर्तमानपत्राने करुन दिली. व्हाईट हाऊस राष्ट्रीय हितसंबंधांपेक्षा देशातील राजकारणाला महत्त्व देते. १९७०च्या दशकात व्हाईट हाऊसने अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, इंधनाचे दर वाढविण्यास नकार दिला होता. आजही बायडेन यांचे प्रशासन याच निवडणूकांसाठी सौदीला दुखावून इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करीत आहेत, असा आरोप द वॉल स्ट्रिट जर्नलने केला.

आज सौदी हा जगातील सर्वात मोठा इंधन उत्पादक देश आहे. अशा परिस्थितीत, बायडेन प्रशासनाने इंधनाच्या उत्पादनात कपात करणाऱ्या सौदीवर कारवाई केली तर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. सौदी रशियाच्या अधिक जवळ जाऊ शकतो, असा इशारा अमेरिकन वर्तमानपत्राने दिला. बायडेन यांच्या धोरणाचे परिणाम नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मध्यवर्ती निवडणुकीत पहायला मिळतील, असा दावा या वर्तमानपत्राने केला आहे.

leave a reply