सौदीचे क्राऊन प्रिन्स भारताच्या भेटीवर येणार

क्राऊन प्रिन्सनवी दिल्ली – सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान पुढच्या महिन्यात भारताच्या भेटीवर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले विशेष आमंत्रण स्वीकारून क्राऊन प्रिन्स भारतात येत असल्याचे सांगितले जाते. त्याच्या आधी, पुढच्याच आठवड्यात सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री भारतात दाखल होणार आहेत. यावेळी भारताचा रुपया व सौदीच्या रियाल या चलनांमधील थेट व्यवहारावर चर्चा होईल. सौदीकडून प्रचंड प्रमाणात इंधनाची खरेदी करणाऱ्या भारताचा, या देशाबरोबर रुपया-रियालमध्ये व्यापार सुरू झाला, तर भारतीय अर्थव्यवस्थेची स्थितीगतीच पालटू शकते. त्यामुळे सौदीचे ऊर्जामंत्री व त्यानंतर क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या भारत भेटीला फार मोठे धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे.

गेल्या महिन्यात भारताचे व्यापारमंत्री पियूष गोयल सौदीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उभय देशांमधील व्यापार, भारतीय औषधांना सौदीत मान्यता यासारख्या मुद्यांबरोबरच रुपया-रियालमधील व्यापारावर महत्त्वपूर्ण चर्चा केली होती. तसेच भारताच्या युपीआय व रूपे कार्ड सौदीत सुरू करण्यावरही व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी सौदीशी चर्चा केल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारत व सौदी अरेबियामधील आर्थिक सहकार्याला फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे. अमेरिकेचा डॉलर हे आंतरराष्ट्रीय चलन असून सौदी तसेच बहुतांश इंधन उत्पादक देश डॉलरमध्येच व्यवहार करतात. मात्र अमेरिकेबरोबरील संबंध ताणल्यानंतर, सौदी अरेबियाने चीनच्या युआनमध्येही व्यवहार करण्यासाठी पावले उचलली होती. हा सौदीने अमेरिकेला दिलेला इशारा असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे होते.

चीनच्या युआन पाठोपाठ सौदी भारताचा रुपया स्वीकारून आपल्या व्यवहारातून डॉलर वजा करीत आहे. याचा फार मोठा लाभ भारताला मिळेल. यामुळे भारताला इंधनासाठी आपल्या गंगाजळीतले अब्जावधी डॉलर्स वापरावे लागणार नाहीत. सौदीच्या पाठोपाठ भारताला इंधन पुरवणारे इतर देश देखील रुपयामध्ये व्यवहार करण्यास तयार होऊ शकतील. यामुळे रुपयाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वासार्हता व प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढेल. अमेरिकेने आपल्या डॉलरचे मुल्य वाढविण्यासाठी उचललेली आक्रमक पावले लक्षात घेता, भारत व सौदी अरेबियामधील या व्यवहाराकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. भारत व रशियाने रुपया-रूबल या आपल्या चलनांमध्ये व्यवहारासाठी पुढाकार घेतल्यानंतर सौदी अरेबिया देखील रशियाप्रमाणे आपल्या इंधनाची विक्री भारताला रुपयामध्ये करील, अशी शक्यता समोर येत आहे.

सौदीचा प्रभाव असलेल्या ओपेक प्लस देशांनी इंधनाच्या उत्पादनात दरदिवशी २० लाख बॅरल्स इतकी कपात करण्याची घोषणा करून अमेरिकेच्या चिंतेत भर घातली आहे. तसे न करता सौदी अरेबियाने इंधनाचे उत्पादन वाढवून, इंधनदर नियंत्रणात ठेवण्यासाठी सहकार्य करावे, ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली मागणी सौदीने धुडकावून लावली आहे. यामुळे अमेरिका व सौदीमध्ये तणाव निर्माण झाला असून याचे परिणाम संभवतील, अशी धमकी अमेरिकेने सौदीला दिली आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबिया भारतासारख्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाबरोबरील सहकार्य अधिकाधिक व्यापक करीत आहे. याला भारताकडूनही प्रतिसाद दिला जात आहे. काही आठवड्यांपूर्वीच भारत व सौदी अरेबियामध्ये सबमरीन केबल अर्थात सागराखालून जाणारी केबल टाकून पर्यायी ऊर्जेसंदर्भात सहकार्य प्रस्थापित करण्यावर चर्चा झाली होती. ही केबल १६०० किलोमीटर इतकी लांब असेल व हा प्रकल्प अब्जावधी डॉलर्सचा असेल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान तसेच सौदीचे ऊर्जामंत्री अब्दुलअझिज बिन सलमान यांच्या भारतभेटीत या प्रकल्पावरही चर्चा अपेक्षित आहे.

leave a reply