इराणबरोबरचा अणुकरार वाचविण्यासाठी बायडेन अमेरिकेला धोक्यात टाकत आहेत

- अमेरिकन विश्‍लेषकाचा इशारा

अणुकरार वाचविण्यासाठी

वॉशिंग्टन/तेहरान – इराणबरोबरचा अणुकरार वाचवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन अमेरिकेला धोक्यात टाकत आहेत, अशी घणाघाती टीका वँग शियूए या विश्‍लेषकांनी केली आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेचे विरोधी पक्षनेते बायडेन यांच्या इराणविषयक धोरणाला सातत्याने लक्ष्य करीत आहेत. इराणबरोबरच्या अणुकरारासाठी बायडेन करीत असलेली धावपळ अनैतिक, र्‍हस्वदृष्टीची, आत्मकेंद्री आणि त्याचवेळी बेकायदेशीर असल्याचा आरोप शियूए यांनी केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अणुकरारासाठी इराणबरोबर चर्चा करण्यासाठी उत्सुकता दाखवित आहेत. पण इराणने आपल्यावरील निर्बंध मागे घेतल्याखेरीज अणुकरार शक्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे. इतकेच नाही तर इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणसमर्थक सशस्त्र गट हल्ले चढवित असल्याचे समोर येत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इराणबाबत स्वीकारीत असलेल्या उदार भूमिकेवर जोरदार टीका सुरू झाली आहे. विश्‍लेषक वँग शियूए यांनीही बायडेन यांच्या धोरणांचा कठोर शब्दात समाचार घेतला.

अणुकरार वाचविण्यासाठीइस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना शियूए यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या इराणबाबतच्या भूमिकेत सामंजस्याचा अभाव असल्याची टीका केली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणबाबत स्वीकारलेल्या भूमिकेपेक्षा बायडेन यांची भूमिका फारशी वेगळी नाही, असे ताशेरे शियूए यांनी ओढले. ओबामा यांच्याच प्रशासनातील कित्येकजण बायडेन यांच्या प्रशासनात कायम असल्याचे शियूए यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत इराणचे तुष्टीकरण करायचे बायडेन यांनी फार आधीच ठरवून ठेवले होते, असा ठपकाही या अमेरिकी विश्‍लेषकांनी ठेवला.

‘इराणमधील क्रूर राजवटीसाठी इराणपेक्षा अमेरिकेतच जास्त सहानुभूती दाखविणारे आहेत. कित्येक इराणी जनता मुकाट्याने निर्बंध सहन करतात करण इराणच्या राजवटीला प्रतिकार करण्यासाठी निर्बंधच हा योग्य मार्ग आहे, हे त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे इराणवरील निर्बंध मागे घेतले तर आपले भले होणार नाही, असेही इराणींना वाटते’ं, असे सांगून शियूए यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या निर्बंधांचे समर्थन केले.

अणुकरार वाचविण्यासाठी

‘ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या अणुकरारानंतर इराण व इराणसंलग्न गट आखातात अधिक प्रभावी बनले. यामध्ये लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, येमेनमधील हौथी बंडखोर तर इराक आणि सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटना, यांची उदाहरणे समोर आहेत. असे असतानाही बायेन प्रशासन इराणच्या राजवटीची का खुशामत करीत आहेत’, असा सवाल शियूए यांनी केला. ‘फक्त ट्रम्प यांनी इराणबाबत घेतलेल्या निर्णयातून माघार घ्यायची, या प्रयत्नात बायडेन प्रशासन अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबरोबर इराणी जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण करीत आहेत’, असा इशारा शियूए यांनी दिला.

या व्यतिरिक्त अमेरिकन विश्‍लेषकांनी बायडेन यांच्या भूमिकेचे समर्थन करणार्‍या आणि ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करणारी माध्यमे डाव्या विचारसरणीची असल्याची टीका शियूए केली. ‘स्वत: घरात सुरक्षित राहणार्‍या पत्रकारांना तिथल्या परिस्थितीची कल्पना येऊच शकत नाही’, असे टीकास्त्र शियूए यांनी सोडले.

दरम्यान, याआधी अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हॅले यांनी देखील बायडेन प्रशासनाच्या इराणबाबतच्या धोरणांवर संताप व्यक्त केला होता. बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकरार करू नये, असे आवाहन इस्रायल तसेच सौदी अरेबियाने केले होते. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन या इशार्‍यांकडे दुर्लक्ष करून अणुकरार करण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे.

leave a reply