चीनकडून उघुरांचा वंशसंहार होत असल्याचा अमेरिकी अभ्यासगटाचा ठपका

उघुरांचा वंशसंहारवॉशिंग्टन/बीजिंग – ‘संयुक्त राष्ट्रसंघाने वंशसंहाराबाबत केलेल्या ठरावातील प्रत्येक तरतुदीचे चीनने उल्लंघन केले आहे. त्यामुळे चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट उघुरवंशियांच्या वंशसंहारासाठी जबाबदार ठरते’, असा ठपका अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. एका स्वतंत्र अभ्यासगटाने आंतरराष्ट्रीय कायदे व संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावातील तरतुदींचा आधार घेत तयार केलेला हा पहिला स्वतंत्र व निष्पक्ष अहवाल असल्याने ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

गेल्या दोन महिन्यात अमेरिका तसेच कॅनडाने, चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने झिंजिआंग प्रांतातील इस्लामधर्मिय उघुरवंशियांचा वंशसंहार घडविला, अशी उघड भूमिका घेतली होती. जानेवारी महिन्यात अमेरिकेचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, चीनची कम्युनिस्ट राजवट उघुरवंशियांना संपविण्यासाठी नियोजनबद्ध रितीने प्रयत्न करीत आहे, असे जाहीर केले होते. तर गेल्या महिन्यात, चीनकडून उघुरवंशिय व इतर तुर्कीवंशिय मुस्लिमांविरोधात वंशसंहार घडविण्यात येत आहे, असा ठराव कॅनडाच्या संसदेत मंजूर करण्यात आला होता.

उघुरांचा वंशसंहारअमेरिका व कॅनडाव्यतिरिक्त ब्रिटन, युरोपिय महासंघ, ऑस्ट्रेलिया, जपान, तुर्की या देशांनीही उघुरवंशियांच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी अभ्यासगटाचा अहवाल चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला अधिकच कोंडीत पकडणारा ठरेल, असे मानले जाते. अमेरिकेच्या ‘न्यूलाईन्स इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजी अ‍ॅण्ड पॉलिसी’ या गटाने सदर अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘द उघुर जिनोसाईड: अ‍ॅन एक्झामिनेशन ऑफ चायनाज् ब्रिचेस ऑफ द १९४८ जिनोसाईड कन्व्हेंशन’ या २५ हजार शब्दांच्या अहवालात, चीनच्या राजवटीने वंशसंहाराशी निगडीत सर्व प्रकारची कृत्ये केल्याचे पुराव्यांनिशी स्पष्ट करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार वंशसंहाराशी निगडित पाच तरतुदींचा उल्लेख अहवालात आहे. त्यात एखाद्या विशिष्ट वंशाची हत्या, विशिष्ट वंशाच्या लोकांचा शारिरीक व मानसिक छळ, विशिष्ट वंशाच्या सदस्यांवर वेगळी जीवनशैली व अटी लादणे, विशिष्ट वंशाची जनसंख्या वाढू नये यासाठी कारवाया करणे आणि एखाद्या वंशातील मुलांना जबरदस्तीने दुसर्‍या वंशात ढकलण्याचा प्रयत्न करणे; यांचा त्यात समावेश आहे. चीनच्या राजवटीने उघुरवंशियांविरोधात या सर्व गोष्टी केल्याचा दावा करून अहवालाचे निष्कर्ष अतिशय स्पष्ट व ठाम असल्याचे अभ्यासगटाने म्हटले आहे.

तीन वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघटनेनेच उघुरवंशियांवरील अत्याचारासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात, झिंजिआंगमधील तब्बल ११ लाखांहून अधिक उघुरवंशियांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना विविध भागांमध्ये उभारलेल्या छळछावण्यांमध्ये डांबण्यात आले आहे, असा आरोप अहवालात ठेवण्यात आला होता. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध अहवालांमध्ये उघुरवंशियांवर होणार्‍या अत्याचाराच्या गोष्टी समोर आल्या असून, त्यात चिनी यंत्रणा उघुरवंशिय महिलांचे लैंगिक शोषण करीत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

चीनची सत्ताधारी राजवट सातत्याने हे आरोप फेटाळत आली आहे. गेल्याच महिन्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या बैठकीत, वंशसंहार वगैरे काहीच घडले नसल्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात प्रसिद्ध होणारी सर्व माहिती तथ्यहीन असल्याचे दावेही वँग ई यांनी केले आहेत.

leave a reply