मुंबईत रात्री आठनंतर जमावबंदी

मुंबई – शनिवारी मुंबईत कोरोनाचे ४१२३ नवे रुग्ण आढळले, तर १२ जणांचा बळी गेला. गेल्या चार महिन्यातील हा उच्चांक असून चिंता अधिक वाढल्या आहेत. यापार्श्‍वभूमीर मुंबई पालिका प्रशासनाने नवे निर्बंध लावले आहेत. यानुसार रात्री आठनंतर जमावबंदी लागू असेल. तसेच रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत संचारबंदीही लागू असणार आहे. तसेच हे आदेश मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मुंबईत कोरोनाची साथ थोपविण्यासाठी निरनिराळे उपाय करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसात शहरातील कोरोनाच्या रुग्णांची वाढलेली संख्या पाहता लॉकडाऊन होईल, अशी भिती व्यक्त करण्यात येत होती. मात्र पालिका प्रशासनाने मुंबईत लॉकडाऊन करण्यात येणार नाही, अशी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. मात्र याबरोबर नियम कडक करण्यात आले आहेत. नागरिकांनी शिस्त व नियमांचे पालन करावे यासाठी दंडात्मक कारवाईही हाती घेण्यात आली आहे.

उद्याने, समुद्र किनार्‍यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री आठपासून सकाळी ७ पर्यंत बंद राहणार आहेत. या तसेच चित्रपटगृह, मॉल, रेस्टॉरंटही या काळात बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. रात्री आठ ते सात वाजेपर्यंत कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू असेल. आदेश मोडणार्‍यांवर एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

याशिवाय रस्त्यावर विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर ५०० रुपये आणि थुंकणार्‍यांना हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. याआधीच जाहीर करण्यात आल्याप्रमाणे लग्नसंमारंभासाठी उपस्थिती ५० इतकी मर्यादीत असेल. तसेच अत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त जणांच्या उपस्थितीला परवानगी नसेल. सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना ३० एप्रिलपर्यंप बंदी असणार आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोनाचे रुग्ण हे सोसायट्यांमधून मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामुळे आता कोरोना रुग्ण आढळणार्‍या सोसायट्यांना प्रतिबंधीत करण्यात येणार आहे.

leave a reply