स्वातंत्र्यदिनाच्या आधी घातपाताचा मोठा कट उधळला – उत्तर प्रदेशात अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली/लखनौ – 15 ऑगस्टआधी बॉम्बस्फोटांची मालिका घडविण्याचा मोठा कट उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने उधळला. लाखनौमधील काकोरी भागातून पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या घरातून मोठा शस्त्र व स्फोटकसाठाही जप्त करण्यात आला असल्याची माहिती, उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. हे दहशतवादी पाकिस्तानी हस्तकाच्या संपर्कात होते. तसेच यातील एक दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यातही सहभागी होता, असे वृत्त आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) हाती घेण्याची शक्यता आहे.

रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये एआयएने मोठी कारवाई केली. एनआयएने अनंतनागमध्ये सात ठिकाणी छापे टाकले. भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी तरुणांची माथी भडकावून त्यांना दहतशवादी संघटनेत सामील करून घेण्याच्या कटासंदर्भात ही छापेमारी झाल्याचे वृत्त आहे. एनआयएने पाच जणांना या प्रकरणात ताब्यातही घेतले. जम्मू-काश्मीरमध्ये ही छापेमारी सुरू असतानाच उत्तर प्रदेशतील लखनौमध्ये अल-कायदाशी संबंधीत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या एटीएसला काही संशयीत हालचालींबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर या संशयीत हालचालींवर गेल्या आठ-दहा दिवसांपासून नजर ठेवली जात होती. यासाठी एका ऑपरेशन हाती घेण्यात आले.

लखनौच्या काकोरीमध्ये दोन घरात काही संशयित व्यक्ती येत जात असल्याचे लक्षात आल्यावर रविवारी पुर्ण तयारीनिशी या घरांमध्ये एटीएसचे अधिकारी घुसले. याआधी या संपूर्ण परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. काकोरीमधील शाहीद नावाच्या एका व्यक्तीच्या घरातून मिनाझ अहमद नावाच्या दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले. तर लखनौच्या सितापूर रोडवरील एका घरातून मसिरूद्दीन नावाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली.

दोन्ही घरातून मोठ्या प्रमाणावर स्फोटके व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शाहीदच्या घरातून दोन प्रेशर कुकर बॉम्ब आणि टाईम बॉम्ब सापडल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. शाहीद अद्याप हाती लागलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी अल कायदाचा दहशतवादी उमल हलमिंदी प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाल्यावर हे ऑपरेशन हाती घेण्यात आल्याचे प्रशांत कुमार म्हणाले. लखनौमध्ये हे भरतीचे प्रयत्न सुरू होते. तसेच बॉम्बस्फोट मालिका घडविण्याचा त्यांचा कट होता, असेही प्रशांत कुमार म्हणाले. मात्र याबाबत अधिक माहिती त्यांनी दिलेली नाही.

याआधी काही बडे नेतेही या दहशतवाद्यांच्या रडावर होते, अशा बातम्या आल्या होत्या. पकडण्यात आलेले दहशतवादी सोशल साईटच्या माध्यामातून पाकिस्तानातील हस्तकांशी संपर्कात होते. तेथून त्यांना थेट सूचना येत होत्या. जम्मू-काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यांशीही या दहशतवाद्यांचा संबंध असावा, असा संशय आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर पोलिसांना या अटकेबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच दिल्ली पोलीसही या दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी आपले पथक उत्तर प्रदेशात पाठविणार आहेत. या दहशतवाद्यांच्या अटकेतून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पश्‍चिम बंगालमध्ये ‘जमात उल मुजाहिद्दीन’च्या (जेएमबी) तीन दहशतवाद्यांनाही रविवारी अटक करण्यात आली. कोलकाता पोलिसांच्या टास्क फोर्सने ही कारवाई केली आहे. हे दहशतवादी येथे एका भाड्याच्या घरात लपून राहत होते. या दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून पश्‍चिम बंगाल पोलिसांनी याबाबत अधिक खुलासा केलेला नाही.

leave a reply