तालिबान कुणासाठी लढत आहे? -अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गनी यांचा मर्मभेदी सवाल

काबुल – तालिबान नक्की कुणासाठी लढत आहे? अफगाणींच्या रक्तपाताने कुणाला लाभ मिळत आहे? याची उत्तरे तालिबानने द्यावी, असे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी खडसावले. अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये आखण्यात आलेली ड्युरंड लाईन तालिबानला मान्य करणार का? अफगाणिस्तानच्या वाट्याचे पाणी तालिबान विक्रीला काढणार का? अशा प्रश्‍नांची सरबत्ती करून राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी तालिबान पाकिस्तानचे हस्तक असल्याचे गंभीर आरोप केले. तसेच दुसर्‍यांचे हस्तक म्हणून तालिबानला अफगाणिस्तानवर कधीही राज्य करू दिले जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला.

खोस्त प्रांतातील सभेत जनतेला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी जनतेला तालिबानच्या विरोधात एकजुटीने खडे ठाकण्याचे आवाहन केले. अफगाणिस्तानच्या 85 टक्के भूमीवर तालिबानने ताबा मिळविल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र बहुसंख्य अफगाणी जनतेला तालिबानची राजवट मान्य नाही. काही ठिकाणी जनतेने तालिबानच्या विरोधात शस्त्रे उचलली असून महिला देखील आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढण्यासाठी पुढाकार घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी तालिबानला मिळत असलेल्या यशामागे पाकिस्तानचा पाठिंबा असल्याची जाणीव अफगाणी जनतेला झाली असून पाकिस्तानच्या विरोधात अफगाणींमध्ये कमालीचा तिरस्कार निर्माण झाला आहे.

याचे प्रतिबिंब राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्या खोस्तमधील सभेत केलेल्या भाषणात उमटले. अफगाणिस्तानात सुरू असलेल्या हिंसाचारात दररोज 200 ते 600 जणांचा बळी जात आहे. या हिंसाचारासाठी तालिबान जबाबदार असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष गनी यांनी ठेवला. अफगाणी जनतेने स्वतंत्र, प्रजासत्ताक अफगाणिस्तानच्या अस्तित्वासाठी एकजूट करावी’, असा संदेश राष्ट्राध्यक्ष गनी यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर पाकिस्तान अफगाणिस्तानवर लादू पाहत असलेली ड्युरंड लाईन तालिबानला मान्य करणार का? असा सवाल करून अफगाणी राष्ट्राध्यक्षांनी तालिबानला कात्रीत पकडले. अफगाणिस्तान-पाकिस्तानातील ड्युरंड लाईन ही सर्वात विवादित सीमा म्हणून ओळखली जाते. या ड्युरंड लाईनच्या वादावरुन 1947 साली अफगाणिस्तानने पाकिस्तानला देश म्हणून मान्यता देण्याचे नाकारले होते.

त्यानंतर गेली 74 वर्षे दोन्ही देशांमध्ये हा ड्युरंड लाईनचा वाद सुरू असून पाकिस्तानच्या सीमाचौक्या आणि काटेरी कुंपण देखील अफगाणिस्तानला मान्य नाही. पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेत या चौक्या व कुंपण उभारीत असल्याचा आरोप अफगाणिस्तान करीत आहे. या ड्युरंड लाईनच्या वादावरून अफगाणी व पाकिस्तानी लष्करात संघर्ष पेटल्याच्या बातम्या येतात. अशा परिस्थितीत, तालिबानने ड्युरंड लाईनबाबत पाकिस्तानशी तडजोड तर केलेली नाही ना, असा सवाल करून राष्ट्राध्यक्ष गनी यांनी तालिबानवर गंभीर आरोप केले. दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानच्या दोनशे जिल्ह्यांवर ताबा मिळविल्याचा दावा केला जातो. तर काही ठिकाणी अफगाणी लष्कराने तालिबानला माघार घेण्यास भाग पाडले आहे. काही भागात अफगाणी लष्कर आणि तालिबानमध्ये घनघोर संघर्ष सुरू असून या संघर्षात ठार होणार्‍या तालिबानी दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या जवानांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. यावरून अफगाणिस्तानच्या सरकारने पाकिस्तानला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता.

leave a reply