रशियन हॅकर्सकडून युक्रेनसह ‘ऍनॉनिमस’च्या वेबसाईटवर सायबरहल्ले

मॉस्को/किव्ह – गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याचे पडसाद सायबरक्षेत्रातही उमटले आहेत. जागतिक स्तरावरील हॅकर्सचा सर्वात मोठा गट असणार्‍या ‘ऍनॉनिमस’ने काही दिवसांपूर्वी रशियाच्या विरोधात सायबरयुद्धाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर रशियन चॅनल्स, इलेक्ट्रिक वाहने तसेच अंतराळसंस्थेच्या नेटवर्कवर सायबरहल्ले झाल्याचे समोर आले होते. या सायबरहल्ल्यांना रशियन हॅकर्सनी प्रत्युत्तर दिले असून ‘ऍनॉनिमस’च्या वेबसाईटसह युक्रेनमधील महत्त्वाच्या वेबसाईट्सवर सायबरहल्ले चढविले आहेत.

‘ऍनॉनिमस’‘किलनेट’ असे नाव असणार्‍या रशियन हॅकर्सच्या गटाने ‘ऍनॉनिमस’च्या मुख्य वेबसाईटवर हल्ला केला आहे. या सायबरहल्ल्यामुळे ‘ऍनॉनिमस’च्या वेबसाईटवर ‘एरर ५००’ येत असून बुधवारी रात्रीपर्यंत वेबसाईट सक्रिय झालेली नव्हती असे सांगण्यात येते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की तसेच युक्रेनमधील उजव्या विचारसरणीचा गट असणार्‍या ‘राईट सेक्टर’ यांच्या वेबसाईटवरही सायबरहल्ले करण्यात आल्याचा दावा ‘किलनेट’ या रशियन हॅकर्सच्या गटाने केला आहे.

‘ऍनॉनिमस’रशिया युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन महिन्यात युक्रेनवर झालेला हा तिसरा सायबरहल्ला ठरला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात युक्रेनमधील विविध बँकांसह सरकारी वेबसाईट्सवर मोठ्या प्रमाणात सायबरहल्ले झाले होते. मात्र यामागे रशियाचा हात असल्याचे समोर आले नव्हते. मात्र त्यानंतर रशिया युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतरही रशियन गटांकडून सायबरहल्ले करण्यात आले. काही दिवसांपूर्वी युक्रेनला सहाय्य करणार्‍या काही युरोपिय गट तसेच अधिकार्‍यांच्या वेबसाईट्सनाही लक्ष्य करण्यात आले होते.

युक्रेनने आपल्या नागरिकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॅकर्सना रशियाविरोधातील सायबरहल्ल्यांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा युक्रेनने केला असून ‘ऍनॉनिमस’चा सहभाग त्याचाच हिस्सा असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी रशियाने २०१५, २०१६ व २०१७मध्ये युक्रेनवर मोठे सायबरहल्ले चढवून ऊर्जा यंत्रणा, बँकिंग तसेच सरकारी नेटवर्क्स खिळखिळी केली होती.

leave a reply