अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोटांमध्ये 34 जणांचा बळी

- आयएसने जबाबदारी स्वीकारली

34 जणांचा बळी काबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानात झालेल्या चार बॉम्बस्फोटांमध्ये 34 जणांचा बळी गेला तर शंभरहून अधिकजण जखमी झाले. शियापंथियांच्या प्रार्थनास्थळाला लक्ष्य करून आपण हे हल्ले चढविल्याचे ‘आयएस’ने जाहीर केले. अफगाणिस्तानातील या हल्ल्यांवर इराणने चिंता व्यक्त केली आहे.

गुरुवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बल्ख आणि कुंदूझ या प्रांतात चार शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. यापैकी पहिला हल्ला राजधानी काबुलला हादरविणारा ठरला. येथील चौकात झालेल्या स्फोटात मुलांचा बळी गेला. त्यानंतर पुढच्या काही तासात बल्ख प्रांताची राजधानी मझार-ए-शरीफ येथील शियापंथियांच्या प्रार्थनास्थळात दहशतवाद्यांनी दोन बॉम्बस्फोट घडविले. यामध्ये सर्वाधिक 20 हून अधिक जणांचा बळी गेला तर 60 जण जखमी झाले. तर कुंदूझ प्रांतात झालेल्या चौथ्या बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांनी तालिबानसाठी काम करणाऱ्या कामगारांना लक्ष्य केले.

आयएस‘ने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. यापैकी शियापंथियांच्या ठिकाणावर गेल्या चोवीस तासात दोन हल्ले झाले. बुधवारी राजधानी काबुलमधील शियापंथियांच्या शाळेत दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले होते. याआधीही आयएसच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील शियापंथियांना लक्ष्य केले होते. राजधानी काबुल, बल्ख, नांगरहार या प्रांतातील शियापंथियांच्या शाळा, प्रार्थनास्थळे आयएसच्या निशाण्यावर आहेत. अफगाणिस्तानातील या स्फोटावर इराणमधून तीव्र प्रतिक्रिया आली आहे.

34 जणांचा बळीइराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली. तसेच तालिबानची राजवट हे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करील, असा विश्वास इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी व्यक्त केला. इराणने याआधीही अफगाणिस्तानातील शियापंथियांवर झालेल्या हल्ल्यांची कठोर शब्दात निर्भत्सना केली होती. युएईने देखील अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानात झालेल्या हल्ल्यांप्रकरणी तालिबानमध्येच मतभेद असल्याचे समोर येत आहे. तालिबानच्या एका गटाने या हल्ल्यांवर टीका केली. तर दुसऱ्या गटाने मात्र आयएसवर टीका करण्याचे टाळले आहे. त्यामुळे तालिबानमध्येच एकवाक्यता नसल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमाभागात केलेल्या हवाई हल्ल्यांवरही तालिबानमधील मतभेद तीव्र झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे अफगाणिस्तानचा कारभार चालविण्यासाठी एकी कायम राखण्याचे मोठे आव्हान तालिबानसमोर खडे ठाकल्याचे दिसत आहे.

leave a reply