रशियाने कुरील बेटांचा अवैधरित्या ताबा घेतला आहे

- जपानचा गंभीर आरोप

कुरील बेटांचाटोकिओ – रशियाने आपल्या ‘नॉर्दन टेरिटरीज्‌‍’ अर्थात कुरील बेटांचा अवैधरित्या ताबा घेतल्याचा आरोप जपानने केला. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्या नेतृत्वाखालील जपानच्या सरकारने आपल्या ‘डिप्लोमॅटिक ब्ल्यु बूक’मध्ये तसा उल्लेख केला आहे. युक्रेनवर हल्ले चढविणाऱ्या रशियावर जपानने निर्बंध लादले आहेत. यामुळे या दोन्ही देशांच्या संबंधातील तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत, जपानच्या या भूमिकेमुळे येत्या काळात रशियाबरोबरील कुरील बेटांचा मुद्दा अधिकच वादग्रस्त ठरेल, असा दावा केला जातो.

काही आठवड्यांपूर्वी जपानने रशियाबरोबर चर्चा करून कुरील बेटांचा मुद्दा सोडविण्यासाठी शांतीचर्चेचा प्रस्ताव दिला होता. पण रशियाने जपानचा हा प्रस्ताव धुडकावला होता. तसेच कुरील बेटांच्या हद्दीत लष्करी सरावाचे आयोजन केले होते. रशियाच्या या सरावावर जपान तसेच अमेरिकेने टीका केली होती. या घटनेला महिनाही उलटत नाही तोच जपानने कुरील बेटांबाबत मोठी घोषणा करून रशियाला आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कुरील बेटांचाजपानने आपल्या ब्ल्यु बूकमध्ये केलेल्या नोंदीनुसार, दक्षिण कुरील बेटे हा जपानच्या भूभाग असल्याचे म्हटले आहे. 2011 सालानंतर जपानच्या सरकारने पहिल्यांदा कुरील बेटांबाबत अशी भूमिका स्वीकारली. तर 2003 सालानंतर पहिल्यांदाच आपल्या राजनैतिक पुस्तिकेत असा उल्लेख केल्याचे जपानची माध्यमे लक्षात आणून देत आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाने जपानच्या नागरिकांना दक्षिण कुरील बेटांचा व्हिसा देण्याचे नाकारले होते. त्याचबरोबर जपानबरोबरच्या अंतराळ सहकार्य करारातूनही माघार घेण्याची घोषणा रशियाने केली होती. त्यानंतर जपानकडून ही प्रतिक्रिया आल्याचा दावा केला जातो.

युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर, रशियावर जपानने देखील निर्बंध लादले आहेत. अमेरिका व युरोपिय देशांना साथ देण्याच्या जपानच्या या भूमिकेवर रशियाकडून प्रतिक्रिया येत आहे. अशा परिस्थितीत, जपानने कुरील बेटांचा वाद छेडून रशियाला आणखी एक चिथावणी दिल्याचे दिसते. मात्र जपानने यावेळी कुरिल बेटांचा मुद्दा उपस्थित करून रशियाबरोबरील तणाव वाढवू नये, असा सूर जपानच्या माध्यमांनी लावला आहे. रशियाबरोबरील जपानच्या तणावाचा लाभ चीन घेईल, याकडे जपानची माध्यमे लक्ष वेधत आहेत.

leave a reply