सिरियन लष्कराच्या बसवर बॉम्बहल्ला

१७ जणांचा बळी

दमास्कस – सिरियाची राजधानी दमास्कसजवळ लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या भीषण बॉम्बहल्ल्यात १७ जणांचा बळी गेला. अद्याप कुठल्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण अशा प्रकारच्या हल्ल्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने सिरियन लष्कराला लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला घडविल्याची दाट शक्यता वर्तविली जाते.

syria bus blastगुरुवारी सकाळी राजधानी दमास्कजवळ सिरियन लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून हा घातपात घडविण्यात आला. याआधीही सिरियन लष्कर दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचे लक्ष्य ठरले होते. फेब्रुवारी महिन्यात लष्कराच्या बसवर घडविलेल्या बॉम्बस्फोटात एका जवानाचा बळी गेला होता. पण गुरुवारच्या स्फोटात मोठ्या संख्येने जवानांचा बळी गेल्याचे समोर येत आहे.

सिरियाच्या उत्तरेकडील भागात तुर्कीसमर्थकांमध्येच संघर्ष भडकल्याचे समोर आले आहे. अलेप्पोच्या अल-बाब भागात दोन तुर्कीसमर्थक गटांमध्ये झालेल्या गोळीबारात १३ जण ठार झाले. या दोन्ही गटांमधील संघर्षाचे कारण उघड झालेले नाही. तर सिरियाच्या ईशान्येकडील कुर्द भागात तुर्कीचे हवाई हल्ले सुरू आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सिरियाच्या उत्तरेकडील सर्वात मोठ्या तुरुंगावर हल्ला झाला होता. ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी कुर्दांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या तुरुंगावर हल्ला चढवून शेकडो दहशतवाद्यांची सुटका केली होती. यातील काही दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात यश मिळाल्याचे कुर्द यंत्रणांनी जाहीर केले होते. पण अजूनही आयएसचे मोठे कमांडर व दहशतवादी फरार असल्याची चिंता व्यक्त केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून ‘आयएस’ पुन्हा सिरियात जम बसवत असल्याचा दावा स्थानिक विश्लेषक करीत आहेत. सिरियन लष्करावरील बॉम्बहल्ले हेच दाखवून देत असल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply