इराकचे बगदाद, कुर्दिस्तान रॉकेट हल्ल्यांनी हादरले

iraq green zone attackबगदाद – गेल्या चोवीस तासात इराकच्या दोन संवेदनशील ठिकाणांवर रॉकेट्सचे भीषण हल्ले झाले. इराकमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना अतिसंरक्षित ग्रीन झोन भागात नऊ रॉकेट्स कोसळले. तर त्याआधी इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील इंधनवायू प्रकल्पावर आठ रॉकेट्सचे हल्ले झाले होते. या दोन्ही हल्ल्यांमध्ये संबंध असल्याचा दावा इराकमधील माध्यमे करीत आहेत.

जवळपास वर्षभरापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीनंतरही इराकला लोकनियुक्त राष्ट्राध्यक्ष मिळालेला नाही. या वर्षीच चार वेळा प्रयत्न करूनही राष्ट्राध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये विजयी ठरलेल्या मुक्तदा अल-सद्रच्या पक्षाला सत्ता देण्यास इराकमधील इराणसंलग्न गट विरोध करीत आहेत. अशा परिस्थितीत, गुरुवारी राष्ट्राध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होण्याआधी बगदादमधील ग्रीन झोन भागात रॉकेट हल्ले झाले. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. इराकमधील इराणसंलग्न गटांनी हा घातपात घडविल्याचा आरोप सद्र गट करीत आहे.

iran khameneiतर इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील ‘खोर मोर’ या नैसर्गिक इंधनवायू प्रकल्पावर बुधवारी आठ रॉकेट्सचे हल्ले झाले. यामध्ये सदर प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कुर्दिस्तान प्रांताला लक्ष्य करणाऱ्या इराण किंवा इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी हे रॉकेट हल्ले चढविल्याचा आरोप होत आहे.

इराकच्या खोर मोर प्रकल्पातून नैसर्गिक इंधनवायूचे उत्खनन करण्याचे कंत्राट युएईची ‘डाना कंपनी’ला मिळालेले आहे. प्रतिदिन ४५ कोटी क्युबिक फूट नैसर्गिक इंधनवायूचे उत्पादन या प्रकल्पातून केले जाते. गेल्या दहा महिन्यांमध्ये सदर प्रकल्पावर झालेला हा पाचवा हल्ला ठरतो. बुधवारी रात्री कुर्दिस्तान प्रांतातील या प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यांसाठी इराणी बनावटीच्या कत्यूशा रॉकेट्सचा मारा झाल्याचे समोर आले आहे.

१६ सप्टेंबरपासून इराणमधील राजवटीच्या विरोधात भडकलेल्या दंगलींसाठी कुर्द बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप इराण करीत आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने आपल्याच देशातील कुझेस्तान या कुर्दवंशियांची बहुसंख्या असलेल्या प्रांतातून धरपकड सुरू केली आहे. तर इराकच्या सीमेजवळील सैन्यतैनाती वाढवून इराणने गेल्या तीन आठवड्यांपासून इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील रॉकेट हल्ले वाढविले आहेत.

Katyusha-rocket-Iraqइराणची प्रगती डोळ्यात खूपत असलेले शत्रूदेश इराणमध्ये दंगली घडवित असल्याचा आरोप इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी केला. तर राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी थेट शब्दात इराणमधील आंदोलनामागे अमेरिका असल्याचा ठपका ठेवला. चौथ्या आठवड्यात पोहोचलेल्या या आंदोलनाला इराणच्या राजवटीने पाश्चिमात्य देशांनी भडकवलेली दंगल असल्याचे म्हटले आहे.

‘इराणसमोर लष्करी कारवाईचा पर्याय योग्य ठरणार नसल्याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळे अमेरिकेने इराणवर निर्बंध आणि मानहानीकारक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण अमेरिकेची लष्करी कारवाई आणि निर्बंध देखील इराणसमोर अपयशी ठरत असल्याचे लक्षात घेऊन अमेरिका व मित्रदेशांनी इराण अस्थिर करण्यासाठी अपयशी पावले उचलली आहेत’, असा गंभीर आरोप इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

दरम्यान, कुर्दिस्तान प्रांतात इराणकडून सुरू असलेल्या रॉकेट हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी इराकचे इंधनमंत्री तेहरानमध्ये दाखल झाले आहेत. पण इराकचे इंधनमंत्री इराणसमर्थक आणि कुर्दविरोधक असल्याचा आरोप अमेरिकन सिनेटर करीत आहेत.

leave a reply