सीमा व्यवस्थापनात पोलिसांची मोठी भूमिका

- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल

हैदराबाद – कायदा आणि सुव्यवस्थेच्या जबाबदारीबरोबर पोलिसांची सीमा व्यवस्थापनातही मोठी भूमिका आहे. देशाचा १५ हजार चौरस किलोमीटरच्या सीमा क्षेत्रात वेगवेगळ्या स्थानिक समस्या आहेत. पाकिस्तान, चीन, म्यानमार आणि बांगलदेशला लागून असलेल्या सीमा भागांमध्ये वेगवेगळी आव्हाने आहे. येथे पोलीस आणि केंद्रीय पोलीसदल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी म्हटले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या आघाडीवर अपयशी असलेला देश मोठा कधीही होऊ शकत नाही, असेही डोवल म्हणाले.

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस ऍकॅडमीमध्ये (सीव्हीपीएनपीए) पार पडलेल्या आयपीएस अधिकार्‍यांच्या पासिंग आउट परेडमध्ये डोवल बोलत होते. भारताचे सार्वभौमत्व हे किनारपट्टीपासून ते भू-सीमावर्ती क्षेत्राच्या शेवटच्या पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रापर्यंत आहे, हे डोवल यांनी अधोरेखित केले. पोलीस अंतर्गत सुरक्षेत महत्वाची जबाबदारी पार पडत असतात. भारतात पोलीसदलातील जवानांची संख्या २१ लाखावर आहे. तर आतापर्यंत ३५ हजार ४८० पोलीस जवानांनी कायदा व सुव्यवस्था राखताना आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सेवा बजाताना शहीद झालेल्या ४० आयपीएस अधिकार्‍यांचे या निमित्ताने स्मरण करायला हवे, असे डोवल म्हणाले.

नागरी समाजात दुफळी निर्माण झाली किंवा जेथे समाज व्यवस्था बिघडली, तर त्या देशाच्या राष्ट्रीय हिताला हानी पोहोचते. अंतर्गत सुरक्षेच्या आघाडीवर अपयशी राहिलेला देश मोठा होऊ शकत नाही. नागरिकांना सुरक्षित वाटत नसेल, तर देशाच्याही विकासावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पोलिसांची भूमिका किती महत्त्वाची असते, हे लक्षात येते. येत्या काळात भारताची गणना जगातील प्रमुख देशांमध्ये होईल. कित्येक आघाड्यावर भारत यशस्वी झाल्याचे पहायला मिळेल, असा विश्‍वास डोवल यांनी यावेळी व्यक्त केला.

leave a reply