आसाममध्ये ब्रम्हपुत्रेच्या पुराचा तीन लाख नागरिकांना फटका

गुवाहाटी – आसाममध्ये आलेल्या पुरात गुरुवारी आणखी दोन नागरिकांचा बळी गेला असून एकूण आतापर्यंत तीन जण या आपत्तीत दगावले आहेत. ब्रम्हपुत्रेला आलेल्या पुरामुळे ३०० गावातील ३ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मागीलकाही दिवसांपासून ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे आसामच्या ढेमाजी, नागाव, होजाई, दरंग, नलबारी, गोलपारा, पश्चिम कार्बी आंग्लॉंग, दिब्रूगड आणि तीनसुकिया या नऊ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या नऊ जिल्ह्यातील ३०० गावातील २९४१७० नागरिक विस्थापित झाले आहेत. तर २१५७२ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.

पुरामुळे बाधीत जिल्ह्यातील नदीचे बंधारे, रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. आसामच्या होजई, गोलपारा, तिनसुकिया आणि पश्चिम कार्बी आंग्लॉँग जिल्हात ९१ रिलिफ कँम्पस् उभारण्यात आली असून याठिकाणी १८ हजार नागरिकांना ठेवण्यात आले आहे.

या पूर परिस्थितीत मदत व बचावकार्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आले आहे. दुर्गम भागातील नागरिकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने खाद्य पदार्थ व आवश्यक साहित्य पोहोचविण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.

leave a reply