राज्य सरकार विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे देणार – केंद्र सरकारकडे केली विनंती

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या साथीचे संकट दिवसेंदिवस वाढत असून या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शाळा सुरू होणार की नाही, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर राज्य सरकारने वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टिव्ही आणि रेडिओवरून शिकता यावे यासाठी राज्य सरकारने दूरदर्शन आणि रेडिओचा काही तासांचा वेळ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी मनुष्यबळ आणि विकास मंत्रालय (एमएचआरडी) आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाने राज्यांना विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे डिजिटल शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी वेळा उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला यासंदर्भातील पत्र पाठविले. या पत्रामध्ये राज्य सरकारची २०२०-२१ शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम डिजिटल माध्यमातून घेण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.

यासाठी राज्य सरकारच्या ‘स्टेट काऊंसिल ऑफ रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग’ने (एससीईआरटी) डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांचे डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केले आहे. या साहित्यांमुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असे नमूद केले आहे.

दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरून शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रसारण केल्यास गाव खेड्यातील मुलांना याचा लाभ मिळेल. ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधाही लागते. त्यासाठी खर्च करावा लागतो. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी गरीब घरातून येतात. त्यामुळे त्यांना या गोष्टी अशक्य आहे. त्यामुळे विद्यर्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड न पडता सुरू राहावे, असा सरकारचा विचार आहे. म्हणून आम्ही दूरदर्शन आणि रेडिओच्या काही तासांचा वेळ मागितला, असे शालेय शिक्षण मंत्री म्हणाल्या.

leave a reply