कोरोनाच्या बळींच्या यादीत ब्राझिल दुसऱ्या स्थानावर

World-Coronaवॉशिंग्टन – जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाखांवर गेली असून चोवीस तासात चार हजारांहून अधिक बळींची भर पडली आहे. कोरोना साथीत सर्वाधिक बळी गेलेल्या देशांच्या यादीत ब्राझिल दुसऱ्या स्थानावर आला असून या देशातील दगावणाऱ्यांची संख्या ४१ हजारांहून अधिक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मोडर्ना’ या कंपनीने आपल्या कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी ठरल्याची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या साथीमुळे २४ तासांमध्ये ४,३८१ बळींची भर पडली असून जगभरात एकूण बळींची संख्या ४,२९,९५६ झाल्याची माहिती ‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटने दिली. जगभरातील एकूण रुग्णांच्या संख्येत १,३९,१९० जणांची वाढ झाली असून ही संख्या ७८,०१,१२७ झाली आहे. साथीतून बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ४०,०२,८८८ झाल्याचे सांगण्यात येते.

World-Coronaअमेरिकेतील रुग्णांच्या संख्येत ९,५६१ जणांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या २१,२६,४८३ झाली आहे. कोरोना साथीत दगावणाऱ्यांची अमेरिकेतील एकूण संख्या १,१७,०३१वर जाऊन पोहोचली आहे. कोरोना बळींच्या यादीत ब्राझिल दुसऱ्या स्थानावर आला असून एकूण ४१,९०१ बळींची नोंद झाली आहे. ब्रिटन तिसऱ्या स्थानावर असून एकूण ४१,६६२ जण साथीत दगावले आहेत.

कोरोनाचे एक लाखांवर रुग्ण असणाऱ्या देशांमध्ये लॅटिन अमेरिकेतील चार देशांचा समावेश असून त्यात ब्राझिलव्यतिरिक्त पेरू, चिली व मेक्सिकोची नोंद झाली आहे. दरम्यान, मोडर्ना या कंपनीने आपल्या कोरोनावरील लसीची मानवी चाचणी यशस्वी झाल्याची माहिती जाहीर केली आहे. यापूर्वी अस्ट्राझेनेका या ब्रिटिश कंपनीने लसीचे उत्पादन सुरू करण्याचे संकेत दिले होते. या कंपनीबरोबर अमेरिका व ब्रिटनसह युरोपातील चार प्रमुख देशांनी लसीसाठी करार केले आहेत.

leave a reply