पाकिस्तानच्या आयएसआयच्या ब्रिगेडियरची दहशतवाद्यांकडून हत्या

पेशावर – पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे ब्रिगेडियर मुस्तफा कमाल बर्की यांची दक्षिण वझिरिस्तानात हत्या झाली आहे. ही हत्या ‘तेहरिक-ए-तालिबान’ने घडवून आणली. या हत्येवर पाकिस्तानच्या पत्रकारांकडून तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण वझिरिस्तान भागात ‘तेहरिक’चे प्राबल्य असून इथे तेहरिकने स्वतःचे राज्य सुरू केल्याचे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे ब्रिगेडियर बर्की यांची हत्या करून तेहरिकने आयएसआयसह पाकिस्तानच्या व्यवस्थेलाच आव्हान दिल्याचे दिसते.

पाकिस्तानच्या आयएसआयच्या ब्रिगेडियरची दहशतवाद्यांकडून हत्यादक्षिण वझिरिस्तान भागातील तेहरिकचा प्रभाव संपविण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर व आयएसआय कामाला लागली होती. यासाठी तेहरिकचे दहशतवादी व समर्थकांना ठार करण्याचा सपाटा आयएसआयने लावला होता. याविरोधात तेहरिकने पाकिस्तानला इशारे दिले होते. पाकिस्तानची जनता व नेत्यांशाही आपले वैर नाही, पण पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांना आम्ही सोडणार नाही, असे तेहरिकने बजावले होते.

ब्रिगेडियर बर्की तेहरिकशी निगडीत असलेल्याचे एन्काऊन्टर करण्यासाठी दक्षिण वझिरिस्तानातील अंगूर अड्डा येथे गेले होते. पण इथे तेहरिकच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या वाहनावर सापळा लावून हल्ला चढविला. या जबरदस्त हल्ल्यात बर्की ठार झाले. त्यांच्यासोबत असलेले आठ सहकारी गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. याआधी तालिबानने बर्की यांच्या मुलाचे देखील अपहरण केले होते व त्याचे पुढे काय झाले ते अजूनही कळलेले नाही, अशी माहिती या निमित्ताने दिली जात आहे.

आजवर पाकिस्तानच्या आयएसआयने भारत व अफगाणिस्तानात घातपात माजवून कितीतरी निरपराध नागरिकांचा बळी घेतला होता. पण दहशतवादाचे भरणपोषण करणाऱ्या आयएसआयसमोरच आता दहशतवादाचा भस्मासूर खडा ठाकला आहे. यामुळे ही गुप्तचर संघटना हवालदिल बनली असून लष्करी अधिकाऱ्यांवरच्या हल्ल्याचे नवे सत्र पाकिस्तानात सुरू झाले आहे.

हिंदी

 

leave a reply