ब्रिटनकडून चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीचा परवाना रद्द

- तीन चिनी गुप्तहेरांचीही हकालपट्टी

लंडन/बीजिंग – ब्रिटन व चीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची धार अधिकच तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी जपानबरोबर संयुक्त युद्धसरावाची घोषणा करणाऱ्या ब्रिटनने चीनला दोन नवे धक्के दिले आहेत. ब्रिटनच्या माध्यम यंत्रणेने चीनची सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या ‘चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क’चा (सीजीटीएन) परवाना रद्द केला आहे. त्याचवेळी ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने पत्रकार म्हणून काम करणाऱ्या चीनच्या तीन गुप्तहेरांची हकालपट्टी केल्याची माहिती दिली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन व प्रशासनाने गेल्या वर्षापासून चीनविरोधात अधिकाधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाव्हायरसच्या मुद्यावर चीनच्या चौकशीसाठी पुढाकार घेणाऱ्या ब्रिटनने ‘5जी’, ‘हाँगकाँग’, ‘उघुरवंशिय’, ‘साऊथ चायना सी’मधील कारवाया यासारख्या मुद्यांवर उघडपणे चीनविरोधी धोरण स्वीकारले आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनने चीनच्या व्यापारी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या पॅसिफिक व्यापारी करारात सहभागाची घोषणा केली होती. गुप्तहेरांच्या हकालपट्टीचे वृत्त व ‘सीजीटीएन’विरोधातील कारवाई या घटना ब्रिटनचे चीनविरोधातील धोरण कायम असल्याची पुष्टी करणाऱ्या ठरतात.

चीनच्या तीन विविध माध्यम कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे पत्रकार प्रत्यक्षात कम्युनिस्ट राजवटीच्या ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’साठी काम करीत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा ‘एमआय5’ने तिन्ही चिनी गुप्तहेरांची देशाबाहेर हकालपट्टी केल्याची माहिती ब्रिटीश सूत्रांनी दिली. दोन महिन्यांपूर्वीच ब्रिटनचे गुप्तचर प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी चीन हा ब्रिटनच्या सुरक्षेसाठी असलेला सर्वात मोठा धोका असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर तीन गुप्तहेरांच्या हकालपट्टीची घटना लक्ष वेधून घेणारी ठरते. पत्रकार म्हणून काम करणाऱ्या गुप्तहेरांच्या हकालपट्टीपाठोपाठ, ब्रिटनने चीनच्या सत्ताधारी राजवटीने सुरू केलेल्या प्रचारयुद्धाचा भाग असणाऱ्या चिनी वृत्तवाहिनीवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. ब्रिटनच्या ‘ऑफिस ऑफ कम्युनिकेशन’ने(ऑफ्कॉम) ‘सीजीटीएन’ या चिनी वृत्तवाहिनीचा परवाना रद्द केला आहे. ‘स्टार चायना मीडिया’ या कंपनीनेे चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीसाठी परवाना मिळविला होता. मात्र या कंपनीचे चिनी वृत्तवाहिनीवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसून ‘सीजीटीएन’ चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून चालविण्यात येत असल्याचे ‘ऑफ्कॉम’ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.

ब्रिटनच्या या कारवाईवर चीन चांगलाच बिथरला असून तांत्रिक मुद्याचे राजकीयीकरण करण्यात येत असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. ब्रिटनच्या कारवाईवर चीन योग्य प्रत्युत्तर देईल, असा इशाराही चीनकडून देण्यात आला आहे. चीनकडून ब्रिटनची सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या ‘बीबीसी’विरोधात टीकास्त्र सोडण्यात आले. कोरोनाव्हायरसची साथ व उघुरवंशियांच्या मुद्यावर ‘बीबीसी’कडून ‘फेक न्यूज’चा प्रसार करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बीबीसीने आपण आपल्या वृत्तांकनावर व माहितीवर ठाम असल्याचा खुलासा केला आहे.

2010 सालानंतर ब्रिटनने चीनबरोबर संबंध अधिक मजबूत व व्यापक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या होत्या. ब्रिटन व चीनमध्ये झालेल्या मोठ्या व्यापारी तसेच गुंतवणुकविषयक करारानंतर दोन देशांमध्ये ‘सुवर्णयुग’ सुरू झाल्याचे दावेही राजकीय नेते तसेच विश्‍लेषकांकडून करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षभरात दोन देशांमधील संबंध बदलण्यास सुरुवात झाली असून ब्रिटन व चीनमधील तणाव अधिकच चिघळू लागल्याचे दिसत आहे.

leave a reply