अमेरिका-रशियातील ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’नंतर चीनकडून अँटी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

बीजिंग – चीनने ‘मिड-कोर्स अँटी बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. यामुळे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे भेदणे अधिक सोपे बनल्याची माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. तसेच ही चाचणी कुठल्याही देशाविरोधात नसल्याचे चीनने म्हटले आहे. पण चीन या चाचणीचा वापर उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची क्षमता वाढविण्यासाठी करू शकतो, असा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहे. तसेच अमेरिका व रशियातील ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’नंतर चीनने ही चाचणी केली, याकडेही अमेरिकी माध्यमे लक्ष वेधत आहेत.

चीनचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने मिड-कोर्स अँटी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती प्रसिद्ध केली. चीनने आपल्याच हद्दीत या क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी घेतली व या चाचणीने आवश्‍यक उद्देश पार पाडल्याचे सदर मुखपत्राने म्हटले आहे. संरक्षणात्मक हेतूने केलेली सदर चाचणी कुठल्याही देशाला धमकावण्यासाठी नव्हती, असा खुलासा चीन देत आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या चाचणीवर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अमेरिकेतील लष्करी विश्‍लेषक व माध्यमांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

अमेरिका आणि रशियाने ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ची मुदत पाच वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने ही चाचणी घेतली, याकडे लष्करी विश्‍लेषक व माध्यमे लक्ष वेधत आहेत. तर सदर मिड-कोर्स अँटी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी ही अंतराळातील अमेरिकेच्या उपग्रहांसाठी धोक्याची ठरू शकते, असा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. कारण आंतरखंडीय क्षेपणास्त्रांना भेदण्याची क्षमता असलेल्या या यंत्रणेचा वापर अँटी सॅटेलाईट अर्थात उपग्रह भेदण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, असे या माध्यमांचे म्हणणे आहे. याआधी 2018 साली देखील चीनने अशाच प्रकारे अँटी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. त्यावेळी देखील चीनने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. तसेच चीनच्या या क्षेपणास्त्रांपासून अंतराळातील अमेरिका तसेच हितसंबंधांच्या उपग्रहांना धोका असल्याची टीका अमेरिकेने केली होती. पण चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते.

तर आपल्या शेजारी देशांबरोबर तणाव वाढत असताना, चीनने अँटी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन या देशांना इशारा दिल्याचा दावा इतर माध्यमे करीत आहेत. तुर्कीच्या वृत्तसंस्थेने उघडपणे चीनच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा आणि लडाखच्या एलएसीवरील भारत-चीन यांच्यातील तणावाचा थेट संबंध असल्याचा दावा केला आहे.

leave a reply