ब्रिटनपाठोपाठ जर्मनीची युद्धनौका ‘साऊथ चायना सी’मध्ये गस्त घालणार

युद्धनौकावॉशिंग्टन – ‘साऊथ चायना सी’च्या गस्तीसाठी आपली युद्धनौका रवाना करण्याची घोषणा जर्मनीने केली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात जर्मनीचे युद्धनौका या सागरी क्षेत्रासाठी रवाना होईल. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील नियमांवर आधारीत सागरी हितसंबंधाच्या सुरक्षेसाठी जर्मनीने घेतलेल्या या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले. तर युद्धनौकेच्या गस्तीमुळे या क्षेत्रातील देशांचे सार्वभौमत्व व सुरक्षा धोक्यात येणार नाही, याची जर्मनीने काळजी घ्यावी, असा इशारा चीनने दिला आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेला आंतरराष्ट्रीय स्तरातून विरोध होत आहे. अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी या क्षेत्रातील आग्नेय आशियाई देशांचे हितसंबंध अधोरेखित करून चीनच्या अरेरावीला विरोध केला आहे. चीनने आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीच्या नियमांचा आदर करावा, असे आवाहन या देशांकडून केले जात आहे. पण येथील ‘ईस्ट व साऊथ चायना सी’वर आपलाच अधिकार असल्याचा दावा चीन करीत आहे.

युद्धनौकाचीनच्या या वाढत्या आक्रमकतेला आव्हान देण्यासाठी नाटो सदस्य देशांनी देखील या सागरी क्षेत्रात आपल्या युद्धनौका रवाना करण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी फ्रान्सने ‘चार्ल्स द गॉल’ विमानवाहू युद्धनौका रवाना केली होती. तर ब्रिटनची ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ ही विमानवाहू युद्धनौका येत्या मे महिन्यात ‘साऊथ चायना सी’मध्ये दाखल होत आहे. ब्रिटनच्या या युद्धनौकेच्या तैनातीला विरोध करून चीनने आधीच धमकी दिली होती.

त्यात ऑगस्ट महिन्यात जर्मनीची युद्धनौका देखील या सागरी क्षेत्रातून प्रवास करणार आहे. २००२ सालानंतर पहिल्यांदा जर्मन युुद्धनौका ‘साऊथ चायना सी’च्या गस्तीवर दाखल होणार आहे. अवघ्या वर्षभरात ‘साऊथ चायना सी’च्या गस्तीसाठी आपली युद्धनौका रवाना करणारा जर्मनी हा तिसरा नाटो सदस्य देश आहे. जर्मनीच्या या घोषणेचे अमेरिकेने स्वागत केले.युद्धनौका

‘या सागरी क्षेत्रात शांती आणि स्थैर्य प्रस्थापित करणे यामागे अमेरिकेचे राष्ट्रीय हित आहे. आंतरराष्ट्रीय सागरी नियमांसाठी आदर, येथील व्यापारी वाहतुकीची सुरक्षा यासाठी अमेरिका बांधिल आहे. त्यामुळे या नियमांवर आधारीत सागरी हितसंबंधाच्या सुरक्षेसाठी जर्मनीने आपली युद्धनौका रवाना करण्याचा निर्णय घेऊन मोठा निर्णय घेतला आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

पण ‘साऊथ चायना सी’मधील नाटो सदस्य देशांच्या युद्धनौकांच्या वाढत्या गस्तीमुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला आहे. जर्मन युद्धनौकेच्या या गस्तीच्या आड सदर सागरी क्षेत्रातील चीनच्या हितसंबंधांना धोका निर्माण होणार नाही, याची जर्मनीने काळजी घ्यावी, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी दिला.

leave a reply