हल्ल्याच्या इशार्‍यामुळे अमेरिकी संसदेचे सत्र रद्द

- संसद व परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवली

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक गटांकडून हल्ल्याची शक्यता असल्याचा अ‍ॅलर्ट मिळाल्यामुळे, राजधानी वॉशिंग्टनमधील अमेरिकी संसदेची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. हल्ल्याच्या अ‍ॅलर्टमुळे अमेरिकी संसदेने गुरुवारी होणारे सत्र रद्द केल्याचीही माहिती देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात ट्रम्प यांचे समर्थक असणार्‍या आंदोलकांनी घडविलेल्या हिंसाचारात पाचजणांचा बळी गेला होता व अनेक जण जखमी झाले होते.

Advertisement

जानेवारी महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राजधानी वॉशिंग्टन व संसदेनजिकच्या परिसरात आधीच ‘नॅशनल गार्ड’च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही ४ ते ६ मार्च या कालावधीत अतिरिक्त सुरक्षाव्यव्यवस्था तैनात करण्यात येत असल्याची माहिती वॉशिंग्टनमधील पोलिसांनी दिली. गुरुवारी किंवा त्यापुढील दिवसांमध्ये निदर्शने अथवा आंदोलनासाठी कोणालाही परवानगी दिली नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे समर्थन करणारे तसेच आक्रमक उजव्या विचारसरणीचे व ‘कॉन्स्पिरसी थिअरी’च्या आधारावर उभारण्यात आलेले काही गट संसदेवर हल्ला करु शकतात, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. यापूर्वी ६ जानेवारी रोजी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेदरम्यान, संसद व परिसरात योग्य सुरक्षाव्यवस्था नव्हती असा ठपका तपासयंत्रणा तसेच काही संसद सदस्यांनी ठेवला होता. त्यामुळेच सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात असल्याचे सुरक्षायंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आले.

जानेवारी महिन्यात झालेल्या घटनेमध्ये आंदोलकांनी थेट संसदीय सभागृहांमध्ये धडक मारली होती. त्यामुळे माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यासह अनेक संसद सदस्यांना कडक सुरक्षाव्यवस्थेत संसदेतून बाहेर काढणे भाग पडले होते. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाने गुरुवारसह पुढील दोन दिवसांमध्ये होणारे सत्र पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. प्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅट पक्षाचे नेते स्टोनी होयर यांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात, आपण २०२४ सालची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढवू शकतो असे संकेत आपल्या समर्थकांना दिले होते.

leave a reply