ब्रिटनकडून भारताला ‘जी-७’ परिषदेचे आमंत्रण

नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या देशात होणार्‍या ‘जी-७’ परिषदेचे भारताच्या पंतप्रधानांना आमंत्रण दिले आहे. तसेच या बैठकीच्या आधी पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारताचा दौरा करणार आहेत. याबाबतची माहिती दिली जात असतानाच, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारताने निर्मिती केलेल्या कोरोनाच्या लसीची प्रशंसा केली आहे. जगभरात लागणार्‍या लसींपैकी ५० टक्क्याहून अधिक लसी भारतात तयार होतात, याचा दाखला देऊन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत ही जगाची ‘फार्मसी’ असल्याचे म्हटले आहे.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित राहणार होते. पण ब्रिटनमध्ये कोरोनाची साथ नव्याने जोर पकडू लागली असून यामुळे या देशात ‘इर्मजन्सी’ जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला देश सोडणे शक्य नाही व यामुळे आपण भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नसल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कळविले होते. याला काही दिवस उलटत नाही तोच, ब्रिटनने ‘जी-७’ परिषदेसाठी भारताच्या पंतप्रधानांना आमंत्रित केले.

अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली व जपान हे ‘जी-७’चे सदस्यदेश आहेत. सदर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांना मिळालेले आमंत्रण भारताचे महत्त्व अधोरेखित करणारी बाब ठरते. जून महिन्यात ही परिषद संपन्न होईल. कोरोनाच्या साथीनंतर अधिक उत्तम, पर्यावरपूरक व समृद्ध भवितव्याचे ध्येय कसे गाठता येईल, यावर जी-७चे सदस्य देश व आमंत्रित देशांची चर्चा पार पडेल. भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाने ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरियाच्या पंतप्रधानांना ब्रिटनमध्ये होणार्‍या या ‘जी-७’चे आमंत्रण देण्यात आले आहे.

दरम्यान, ही परिषद संपन्न होण्याच्या आधी पंतप्रधान जॉन्सन भारताचा दौरा करतील, असे ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाने दिली आहे. याबरोबरच भारताला सदर परिषदेसाठी आमंत्रित करीत असताना, पंतप्रधान जॉन्सन यांनी भारताने विकसित केलेल्या कोरोनाच्या लसींचा दाखला देऊन यासाठी भारताची प्रशंसा केली. भारत म्हणजे जगाची फार्मसी आहे, अशा शब्दात ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारताचे कौतुक केले आहे. ‘जगभरात लागणार्‍या लसींपैकी ५० टक्क्यांहून अधिक लसींची निर्मिती भारतात केली जाते. कोरोनाची साथ आलेली असताना भारत व ब्रिटनने एकमेकांना सहकार्य केले होते’, असेही पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढे म्हणाले.

leave a reply