सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणसंलग्न गटांनी नागरी वस्त्यांमध्ये तळ ठोकले

इराणसंलग्न

अलेप्पो – गेल्या आठवड्याप्रमाणे इस्रायल पुन्हा आपल्या ठिकाणांवर भीषण हल्ले चढवू शकतो, अशी भीती इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना वाटत आहे. या भीतीमुळे इराणचे जवान व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी पूर्व सिरियातील लष्करी तळ रिकामे केले व येथील नागरी वस्त्यांमध्ये तळ ठोकले आहेत. अमेरिकेत ज्यो बायडेन यांचे प्रशासन येण्याआधी इस्रायलकडून आणखी एका हल्ल्याची शक्यता वर्तविली जाते.

गेल्या आठवड्यात १३ जानेवारी रोजी सिरियाच्या पूर्वेकडील ‘देर अल-झोर’ या भागात जोरदार हवाई हल्ले झाले. सिरियन लष्कर व मुखपत्राने या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. पण इस्रायलने अद्याप या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. येथील लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यात ५७ जण ठार झाले होते. इराणसंलग्नयामध्ये इराणचे जवान व इराणसंलग्न दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती मानवाधिकार संघटनांनी दिली होती. या ठिकाणी इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित साहित्य देखील या लष्करी तळांच्या पाईपलाईनमध्ये दडविल्याची बातमीही समोर आली होती.

देर अल-झोरमधील या हल्ल्यात आपली जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी म्हटले होते. तसेच या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी सदर अधिकार्‍याने दिली होती. पण आखातातील वेगवेगळ्या माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, देर अल-झोरमधील हल्ल्यानंतर इराणने येथील लष्करी तळांचा ताबा सोडला आहे.

सदर तळ, ठिकाणे सोडण्याआधी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जवान व इराणसंलग्न संघटनांच्या दहशतवाद्यांनी येथील शस्त्रास्त्रांची गोदामे देखील रिकामी केली आहेत. देर अल-झोर, मयादिन, अलबुकमल येथील नागरी वस्त्यांचा इराणच्या जवान व दहशतवाद्यांनी ताबा घेतला आहे. त्याचबरोबर लष्करी तळावरुन आणलेले रॉकेट्स, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रसाठा या नागरी वस्त्यांमध्ये भुयारे खोदून त्यात दडविली आहेत. इराणसंलग्नत्याचबरोबर आपल्या नव्या ठिकाणांचा इस्रायली यंत्रणांना ठावठिकाणा लागू नये, यासाठी इराणचे जवान व इराणसंलग्न दहशतवाद्यांनी बॅनर्स तसेच ध्वज फडकविण्याचे टाळल्याची माहिती स्थानिक पत्रकाराने दिली.

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन लवकरच या देशाची सूत्रे हाती घेणार आहेत. बायडेन सत्तेवर आल्यानंतर सिरियातील इस्रायलच्या कारवायांना समर्थन मिळणार नाही, याची खात्री इस्रायलला पटत चालली आहे. त्यामुळे बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याआधी इस्रायल पुन्हा एकदा सिरियातील इराणचे लष्कर व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर मोठे हल्ले चढवू शकतो, अशी भीती इराणला वाटत आहे. यामुळे सिरियातील इराणचे लष्कर व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी पुढील काही दिवस नागरी वस्त्यांमध्ये दडून राहण्याचे धोरण स्वीकारल्याचा दावा कुवैती साप्ताहिकाने केला.

सध्या सिरियामध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स व कुद्स फोर्सेसच्या जवानांबरोबर लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, अफगाणिस्तानातील फतेमिया ब्रिगेड, पाकिस्तानातील झैनेबिया ब्रिगेड, तर सिरिया-इराकमधील बाटालियन ३१३, बाकिर ब्रिगेड आणि इतर दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. गेल्या आठवड्यात इस्रायलने ‘देर अल-झोर’ येथील ३५ ठिकाणांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यात या आघाडीच्या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते.

leave a reply