ब्रिटन 2030 सालापर्यंत आठ नवे अणुऊर्जा प्रकल्प उभारणार

-पंतप्रधान बोरिस जॉन्सन

लंडन – युरोपसह ब्रिटनमधील ऊर्जा संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असतानात ब्रिटनच्या पंतप्रधानांनी 2030 सालापर्यंत आठ नवे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. ब्रिटनमधील ऊर्जा संकट सोडविण्यासाठी अणुऊर्जा हा एक पर्याय आहे, असे सांगून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘साईझवॉल-सी’ या प्रकल्पात 70 कोटी पौंडाची गुंतवणूकही जाहीर केली.

eight new nuclear power plantsयुरोपातील इतर देशांप्रमाणेच ब्रिटननेही रशियाकडून होणाऱ्या इंधनआयातीवर निर्बंध लादले आहेत. दुसऱ्या बाजूला उष्णतेची लाट व दुष्काळामुळे जलविद्युत प्रकल्पांमधून होणारे वीजेचे उत्पादन थांबले आहे. इतर युरोपिय देशांमधील वीजनिर्मिती घटल्याने ब्रिटनकडून आयात होणाऱ्या वीजेवरही परिणाम झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नजिकच्या काही महिन्यांमध्ये ब्रिटीश जनतेसह उद्योगक्षेत्राला वीजटंचाईचा मोठा फटका बसण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर ब्रिटनचे मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अणुऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करून लक्ष वेधून घेतले. गेल्या काही वर्षात ब्रिटनमध्ये एकही नवा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही याकडे जॉन्सन यांनी लक्ष वेधले. सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पांच्या विस्ताराकडे दुर्लक्ष झाल्याचा दावाही त्यांनी केला. या दुर्लक्षामुळे जवळपास 60 लाख घरांना मिळणाऱ्या वीजेचे उत्पादन थंडावल्याचे जॉन्सन यांनी सांगितले. मात्र पुढील काळात ही कमतरता भरून काढली जाईल व आठ नवे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील, अशी ग्वाही जॉन्सन यांनी दिली. आपल्यानंतर ब्रिटनची सूत्रे हाती घेणारे नेतृत्त्वही याकडे लक्ष देईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

leave a reply