वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक झॅपोरिझिआ अणुप्रकल्पात दाखल

International Atomic Energy Commission teamमॉस्को – झॅपोरिझिआ भागातील हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक अणुप्रकल्पात दाखल झाले. हे पथक पुढील काही दिवस प्रकल्पाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात येते. आयोगाचे पथक प्रकल्पात दाखल होत असतानाच रशियाने या पथकाच्या मार्गात हल्ले चढविल्याचा आरोप युक्रेनने केला. तर युक्रेनच्या काही जवानांनी प्रकल्पाच्या परिसरात घुसून घातपात घडविण्याचा कट आखला होता, असा प्रत्यारोप रशियाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, रशियन लष्कर डोन्बास क्षेत्रावर पूर्ण ताबा मिळविण्याच्या दिशेने हळुहळू पुढे सरकत असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला.

UKRAINE-RUSSIA-UN-CONFLICT-WAR-IAEA-NUCLEARमार्च महिन्याच्या सुरुवातीलाच रशियाने युक्रेनच्या झॅपोरिझिआ प्रांतात असणाऱ्या अणुप्रकल्पावर ताबा मिळविला होता. रशियाने ताबा मिळविल्यानंतरही या प्रकल्पात युक्रेनी कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत. प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी रशियाने परिसरात मोठी लष्करी तैनाती केली आहे. सुरुवातीचे काही महिने शांततेत गेल्यानंतर जुलै महिन्यात युक्रेनने रशियाच्या ताब्यात असणाऱ्या दक्षिण युक्रेनमधील भागांवर प्रतिहल्ले सुरू केले होते. यात झॅपोरिझिआ प्रांताचाही समावेश होता.

युक्रेनने झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पावरही हल्ले केल्याने प्रकल्पाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. रशियाने हा मुद्दा सुरक्षा परिषदेतही उपस्थित केला होता. मात्र प्रकल्पातील लष्करी तैनाती काढून घेण्याची मागणी स्पष्ट शब्दात फेटाळली होती. दुसऱ्या बाजूला युक्रेनने रशियावरच हल्ल्यांचे आरोप करून ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ करीत असल्याचे दावे केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक अणुप्रकल्पात दाखल होणे महत्त्वाची घटना ठरते. या भेटीमुळे प्रकल्पाबाबत असणारे सर्व गैरसमज दूर होतील, असा विश्वास रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.

Zaporizia nuclear plantआयोगाचे पथक प्रकल्पात दाखल होण्यापूर्वी झॅपोरिझिआ परिसरातील हल्ले वाढल्याचे दावे दोन्ही देशांकडून करण्यात आले आहेत. युक्रेनने प्रकल्पाच्या परिसरात हल्ले करून आपल्या जवानांना घुसविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने ठेवला. हे जवान प्रकल्पात घातपात घडविणार होते, असेही रशियाने सांगितले. तर आयोगाचे पथक जाण्यापूर्वी त्यांच्या मार्गात हल्ले चढविल्याचा दावा युक्रेनने केला. प्रकल्प व परिसरात पथकाच्या सुरक्षेची जबाबदारी युक्रेन घेणार नसल्याचेही युक्रेनकडून सांगण्यात आले. रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे प्रकल्पातील पाच अणुभट्ट्या बंद पडल्याचेही युक्रेनने आपल्या आरोपात म्हटले आहे.

दरम्यान, रशियाने डोन्बास प्रांतावर संपूर्ण नयंत्रण मिळविण्याच्या दिशेने हळुहळू वाटचाल सुरू ठेवल्याचा दावा पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी केला. गेल्या काही दिवसात डोनेत्स्क प्रांतातील बाखमत शहरानजिकच्या भागातील हल्ले वाढविण्यात आले आहेत. रशियन लष्कर या शहराला वेढा घालण्याची तयारी करीत असून काही पथके आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरात दाखल झाली आहेत. सिवेर्स्क तसेच इझिअम-स्लोव्हिआन्स्क क्षेत्रात हवाईहल्ले तसेच तोफांच्या माऱ्याची तीव्रता वाढविण्यात आल्याचे रशियन संरक्षण विभागाने सांगितले. ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह शहरालाही लक्ष्य करण्यात आले. तर युक्रेनने खेर्सनमध्ये प्रतिहल्ले करताना वीसहून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले आहे.

leave a reply