ब्रिटीश अर्थव्यवस्थेला 300 वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीचा फटका बसेल

- अर्थमंत्री ॠषि सुनक यांचा दावा

ब्रिटीश अर्थव्यवस्थेलालंडन – कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटीश अर्थव्यवस्थेला गेल्या 300 वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीला सामोरे जावे लागेल, असा दावा ब्रिटनचे अर्थमंत्री ॠषि सुनक यांनी केला. ब्रिटनच्या संसदेत बोलताना अर्थमंत्री सुनक यांनी, जगातील सहाव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असणाऱ्या ब्रिटनचा जीडीपी या वर्षात तब्बल 11.3 टक्क्यांनी घटेल, असे सांगितले. त्याचवेळी ब्रिटनमधील बेकारी साडेसात टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवून जवळपास 26 लाख जणांचा रोजगार जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात अर्थमंत्री सुनक यांनी ‘ब्रेक्झिट’चा उल्लेख केला नसला तरी ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने दिलेल्या इशाऱ्यात, ‘नो डील ब्रेक्झिट’चा धक्का कोरोनापेक्षा मोठा असेल, असे बजावण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचे 15 लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून, 56 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ब्रिटनमध्ये यापूर्वी लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे उद्योगक्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ब्रिटनच्या विविध भागांमध्ये त्याविरोधात मोठी निदर्शनेही झाली आहेत. याच पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर, अर्थमंत्र्यांनी उभे केलेले चित्र ब्रिटनमधील विदारक स्थिती दाखविणारे ठरते.

ब्रिटीश अर्थव्यवस्थेला

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना साथीचा फटका संपूर्ण जगाला बसला असून अमेरिका व युरोपसह सर्व प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत. वर्ल्ड बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह सर्व प्रमुख यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था पुन्हा मंदीत ढकलली जाऊ शकते, असे भाकितही वर्तविले आहे. ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी दिलेली माहिती त्याला पुष्टी देणारी ठरते. ब्रिटीश संसदेसमोर केलेल्या भाषणात अर्थमंत्री सुनक यांनी 2025 सालापर्यंतचा काळ ब्रिटनसाठी आव्हानात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. या वर्षाच्या अखेरीस 11.3 टक्क्यांपर्यंत घसरणारी अर्थव्यवस्था पुढील वर्षी सावरेल, मात्र त्यानंतर पुन्हा त्यात घट होईल, असे ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोना साथीने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ब्रिटनला मोठ्या प्रमाणावर कर्ज काढावे लागणार असून या वर्षातील कर्ज 400 अब्ज पौंडांपर्यंत जाईल, असे सुनक यांनी सांगितले. ब्रिटनमधील आरोग्य आणीबाणी संपलेली नाही आणि आर्थिक आणीबाणी आता सुरू होत आहे, या शब्दात त्यांनी भविष्यातील आर्थिक संकटाची जाणीव करून दिली. फक्त कोरोना साथीला तोंड देण्यासाठी 2020मध्ये ब्रिटनला तब्बल 280 अब्ज पौंड खर्च करावे लागणार आहेत, असेही ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

leave a reply