सिरियाने इराण व हिजबुल्लाहशी सहकार्य करू नये

- इस्रायली लष्कराचा खरमरीत इशारा

इराण व हिजबुल्लाहजेरूसलेम – इस्रायलच्या सीमेजवळ स्फोटके पेरून हल्ले चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराण व हिजबुल्लाहबरोबरच्या लष्करी सहकार्यातून माघार घ्या, असा इशारा इस्रायलच्या लष्कराने दिला. इस्रायलच्या लष्कराने सिरियातील गोलान भागात टाकलेल्या पत्रकातून हा इशारा दिल्याचा दावा सिरियन माध्यमांनी केला. इस्रायलने सिरियात चढविलेल्या हल्ल्यानंतर ही पत्रके ‘एअरड्रॉप’ केल्याचे सिरियन माध्यमांनी म्हटले आहे.

इस्रायलच्या गोलान टेकड्यांमध्ये तैनात असलेल्या इस्रायली लष्कराच्या ‘210 डिव्हिजन’ने सिरियाच्या गोलान भागात पत्रके ‘एअरड्रॉप’ केल्याचा दावा सिरियन माध्यमांनी केला. यामध्ये ‘इस्रायलच्या गोलान टेकड्यांमध्ये अस्थैर्य निर्माण करण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही. इराण तसेच हिजबुल्लाहच्या हस्तकांविरोधात कुठल्याही क्षणी कारवाई केली जाईल’, असे बजावल्याचे सिरियन माध्यमांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इराण आणि हिजबुल्लाह सिरियातील लष्करी तळांचा तसेच सिरियन नागरिक व जवानांचा इस्रायलविरोधात दहशतवादी हल्ले चढविण्यासाठी वापर करीत आहेत. सिरियन लष्कराने इराण व हिजबुल्लाहबरोबरचे सर्व लष्करी सहकार्य तोडावे. अन्यथा इस्रायलवरील इराण व हिजबुल्लाहच्या हल्ल्यांसाठी सिरियन लष्कराला जबाबदार धरले जाईल, असा इशारा या पत्रकात दिल्याची बातमी सिरियन माध्यमांनी प्रसिद्ध केली.

सिरियन माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातमीवर इस्रायली लष्कराने बोलण्याचे टाळले आहे. गेल्या महिन्यातही सिरियाच्या गोलान भागात इस्रायली लष्कराच्या नावाने अशीच पत्रके ‘एअर ड्रॉप’ करण्यात आली होती. त्यातही सिरियन लष्कर व जनतेला इराण, हिजबुल्लाह व इराणसंलग्न गटांपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर इस्रायलने सिरियाच्या गोलान भागात किमान दोन वेळा हवाई हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन माध्यमांनीच केला होता.

leave a reply