ब्रिटनच्या संसदेने चिनी राजदूतांना प्रवेश नाकारला

लंडन/बीजिंग – ब्रिटीश संसद सदस्यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर ब्रिटनच्या संसदेने चीनचे राजदूत झेंग झेगुआंग यांना प्रवेश नाकारला आहे. चीनच्या राजवटीने ब्रिटनच्या संसद सदस्यांवर निर्बंध लादले असताना चीनचे राजदूत संसदेत येऊ शकत नाहीत, अशी आक्रमक भूमिका संसद सदस्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. ब्रिटनच्या संसदेने घेतलेला निर्णय  भ्याडपणाचा व तिरस्करणीय असल्याची  टीका ब्रिटनमधील चिनी दूतावासाने केली आहे.

गेली काही वर्षे ब्रिटन व चीनमध्ये अनेक गोष्टींवरून वाद सुरु आहेत. ‘५जी तंत्रज्ञान’, ‘हॉंगकॉंग’, ‘साऊथ चायना सी’, उघुरवंशिय या मुद्यांवर ब्रिटनने चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनकडून उघुरवंशियांवर सुरू असलेल्या अत्याचारांच्या मुद्यावर ब्रिटीश संसद सदस्यांनी टीकास्त्र सोडले असून त्याला वंशसंहार ठरविण्याच्या हालचालीही सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनने  मार्च महिन्यात ब्रिटनच्या सात संसद सदस्यांवर निर्बंध लादले होते.

या निर्बंधांविरोधात ब्रिटनने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाही ब्रिटीश संसदेतील चीनसमर्थक गटाने चीनच्या राजदूतांना संसदेतील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. ही गोष्ट समोर येताच निर्बंध टाकलेल्या संसद सदस्यांनी सभापतींना पत्र लिहिले. चीनने टाकलेले निर्बंध केवळ सदस्यांवरच नाही तर ब्रिटीश संसदेच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचा मुद्दा यात उपस्थित करण्यात आला. अशा पार्श्‍वभूमीवर राजदूतांना प्रवेश देणे निर्बंधांना मान्यता देणे ठरेल, असा दावा संसद सदस्यांनी केला.

संसद सदस्यांची नाराजी लक्षात घेऊन संसदेच्या सभापतींनी  बुधवारी चीनचे राजदूत झेगुआंग यांना संसदेत प्रवेश नाकारला. सभापतींनी घेतलेल्या या निर्णयाचे ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री साजिद जाविद यांनी समर्थन केले आहे. मात्र चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून यापुढे ब्रिटनच्या राजदूतांनाही चिनी संसदेत प्रवेश नाकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी दोन देशांमधील संबंधांवरही याचा परिणाम होऊ शकतो, असे चीनच्या दूतावासाने बजावले आहे.

leave a reply