इंधनपुरवठ्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन सौदी अरेबियाचा दौरा करणार

ब्रिटनचे पंतप्रधानलंडन/मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनदरांमध्ये उडणार्‍या भडक्याचा सर्वाधिक फटका युरोपिय देशांना बसल्याचे समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर इंधन उत्पादनात आघाडीवर असलेल्या आखाती देशांनी इंधनपुरवठा वाढवावा यासाठी युरोपिय देशांनी जोरदार राजनैतिक हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन येत्या काही दिवसात सौदी अरेबियाला भेट देतील, असा दावा ब्रिटीश दैनिकाने केला आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदीसह ‘ओपेक’ सदस्य देशांना इंधन उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले होते. मात्र ‘ओेपेक’ने हे आवाहन धुडकावून लावले होते.

ब्रिटनचे पंतप्रधानरशियाने युक्रेनवर केलेली लष्करी कारवाई व पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर लादलेले कडक निर्बंध यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चे तेल व इंधनवायु दर कडाडले आहेत. कच्च्या तेलाच्या दरांनी प्रति बॅरल १०० डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून इंधनवायुचे दरही प्रति हजार घनमीटरमागे दोन हजार डॉलर्सवर पोहोचले आहेत. युद्ध लांबल्यास तेल व इंधनवायुचे दर विक्रमी स्तरावर जाण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर युरोपिय देशांचे धाबे दणाणले असून इंधनासाठी राजनैतिक हालचालींना वेग आला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधानपंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा संभाव्य सौदी दौराही याचाच भाग असल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान जॉन्सन आपल्या भेटीत सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा करून इंधनाचा पुरवठा वाढविण्याचे आवाहन करतील, असा दावा ब्रिटीश माध्यमांनी केला आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी पंतप्रधानांच्या दौर्‍याची पुष्टी केली नसली तरी सौदी अरेबियाबरोबर चर्चा करण्याच्या दाव्यांचे समर्थन केले आहे. ‘सौदी अरेबिया जगातील आघाडीचा इंधनउत्पादक देश आहे. सध्याच्या इंधनसमस्येच्या पार्श्‍वभूमीवर या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्व देशांनी एकत्र येऊन समस्येला तोंड देण्याची गरज आहे’, असे जाविद म्हणाले.

ब्रिटनचे पंतप्रधानअमेरिका व युरोप आखाती देशांबरोबर चर्चेसाठी हालचाली करीत असतानाच, रशिया आखात व आफ्रिकेच्या माध्यमातून नाटोच्या प्रभावाला धोका निर्माण करीत असल्याचा दावा विश्‍लेषक व माजी लष्करी अधिकार्‍यांनी केला. ‘रशिया खालच्या बाजूने नाटोला धोका निर्माण करण्याच्या हालचाली करीत आहे. नाटोने आपल्याला घेरल्याची भावना रशियामध्ये निर्माण झाली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ते नाटोला घेरण्याचे प्रयत्न करीत आहेत’, असा दावा युरोपियन विश्‍लेषक क्रिस्तिना कॉख यांनी केला.

‘गेल्या पाच ते सहा वर्षात रशिया आपले लष्करी सामर्थ्य अधिक व्यापक क्षेत्रापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. आपण अजूनही जगातील प्रमुख सत्ता आहोत व जागतिक समस्यांवर आपल्या भूमिकेला महत्त्व आहे, हे दाखविण्यासाठी रशिया हालचाली करीत आहे’, याकडे नाटोचे माजी लष्करी प्रमुख जनरल फिलिप ब्रीडलव्ह यांनी लक्ष वेधले. रशियाने गेल्या काही वर्षात माली, सुदान, सिरिया, अल्जिरिया, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक यासारख्या देशांबरोबरील लष्करी सहकार्य वाढविले आहे, याची जाणीवही विश्‍लेषक करून देत आहेत.

गेल्या महिन्यात जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ऍनालेना बेअरबॉक यांनी आफ्रिकेत पाश्‍चिमात्यांच्या प्रभावाला मिळणारे आव्हान दुर्लक्ष करण्यासारखे नाही, असा इशाराही दिला होता. फ्रान्स व युरोपिय महासंघाने आफ्रिकेत रशियाच्या कंत्राटी सैनिकांच्या वाढत्या हालचालींवर चिंता व्यक्त केली होती. त्याचवेळी सिरिया, इराण यासारख्या देशांबरोबरच ओपेक सदस्य देशांबरोबरील रशियाचे वाढते सहकार्य चिंतेची बाब आहे, यावरही विश्‍लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे.

leave a reply