इंधनसाठ्याच्या सुरक्षेसाठी ब्रिटनचे लष्कर सौदीमध्ये तैनात

लंडन – ब्रिटनने सौदी अरेबियामध्ये छुप्यारितीने लष्कर तैनाती केल्याचे उघड झाले आहे. सौदीतील इंधनसाठ्यांच्या सुरक्षेसाठी ही तैनाती केल्याचा खुलासा ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. पण ब्रिटनच्या संसदेला न कळवताच ही तैनाती केल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, इराणच्या शास्त्रज्ञाची हत्या, अमेरिकेचे बॉम्बर्स व त्यापाठोपाठ विमानवाहू युद्धनौकेची तैनाती, यामुळे आखातातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्‍वभूमीवर सौदीतील ब्रिटनची तैनाती संवेदनशील मुद्दा बनला आहे.

ब्रिटनचे लष्कर

ब्रिटनमधील वर्तमानपत्राने सौदीतील या छुप्या लष्कर तैनातीची माहिती उघड केली. ब्रिटनच्या लष्करातील ‘16वी रेजिमेंट रॉयल आर्टिलरी’चे जवान त्याचबरोबर ‘जिराफ’ रडार यंत्रणा ही सौदीत तैनात करण्यात आल्याची बातमी सदर वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये ब्रिटिश जवान व रडार यंत्रणा तैनात असल्याचे या बातमीत म्हटले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच सौदीत ही तैनाती सुरू असून पंतप्रधान जॉनसन यांनी यासंदर्भातील माहिती दडवून ठेवल्याचा आरोप या वर्तमानपत्राने केला. पंतप्रधान जॉनसन यांच्या विरोधकांनी ही बातमी उचलून धरल्यानंतर ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत खुलासा केला.

सौदीच्या इंधनसाठ्यांवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे संवेदनशील आर्थिक पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी जवान तसेच रडार यंत्रणेची तैनाती करावी लागल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. यापैकी ‘जिराफ’ रडार यंत्रणेच्या सहाय्याने 75 मैल अंतरावरील शत्रूची विमाने, ड्रोन्स तसेच क्षेपणास्त्रांचा माग काढता येऊ शकतो. या यंत्रणेच्या तैनातीमुळे सौदीच्या इंधनसाठ्यांवरील हवाई हल्ले रोखता येतील, असा दावा ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला. त्याचबरोबर ही तैनाती पूर्ण झाली नसून येत्या काळात सौदीमध्ये आणखी तैनाती केली जाईल, असे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

ब्रिटनचे लष्कर

वर्षभरापूर्वी 14 सप्टेंबर 2019 रोजी सौदीतील अबकैक आणि खुरैस या दोन शहरातील अराम्को कंपनीच्या इंधन प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा दाखला ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिला. अबकैक व खुरैस इंधन प्रकल्पांवरील हल्ल्यांची जबाबदारी येमेनमधील हौथी बंडखोरांनी स्वीकारली होती. पण इराणने हे हल्ले चढविल्याचा आरोप सौदीने केला होता. या हल्ल्यामुळे सौदीच्या इंधननिर्यातीवर मोठा परिणाम झाला होता. या हल्ल्यानंतर सौदीतील इंधनसाठ्यांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनला हा निर्णय घ्यावा लागल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून सौदीचे इंधनप्रकल्प, इंधनसाठे तसेच ऑईल टँकर्सवरील हल्ले वाढले आहेत. येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोर ड्रोन्स तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हे हल्ले चढवित आहेत. सौदी व अरब मित्रदेशांकडून हौथींच्या या हल्ल्यांना उत्तर दिले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी इराणचे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या करण्यात आली. आपल्या शास्त्रज्ञाच्या हत्येसाठी इस्रायल व अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप करून इराणने प्रत्युत्तराची धमकी दिली आहे. इराणकडून ही धमकी दिली जात असताना, अमेरिकेची ‘युएसएस निमित्झ’ ही महाकाय विमानवाहू युद्धनौका आपल्या ताफ्यासह पर्शियन आखातात दाखल होत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेची ‘बी-62’ बॉम्बर्स विमाने कतारमध्ये दाखल झाली आहेत.

अशा काळात ब्रिटनच्या लष्कराची सौदीतील तैनातीची माहिती उघड होणे लक्षवेधी बाब ठरत आहे.

leave a reply