गुगलकडून सौदी-इस्रायलला जोडणाऱ्या इंटरनेट केबलचा प्रस्ताव

तेल अवीव/रियाध – ‘आयटी’ क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगलने सौदी अरेबिया व इस्रायल या देशांना जोडणाऱ्या ‘अंडरसी इंटरनेट केबल’चा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव दक्षिण आशिया व युरोपला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘ब्ल्यू रामन फायबर ऑप्टिक केबल’चा भाग आहे. आखातातील परंपरागत शत्रू म्हणून ओळख असणारे सौदी अरेबिया व इस्रायल हे देश इराणच्या मुद्यावर एकत्र येत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुगलचा प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

भारतातून युरोपपर्यंत जाणाऱ्या ‘ब्ल्यू रामन फायबर ऑप्टिक केबल’साठी गुगलने ओमान व इटलीतील कंपन्यांचे सहाय्य घेतले आहे. हा प्रकल्प सुमारे 40 कोटी डॉलर्सचा असून त्याची पूर्वतयारी आधीच सुरू झाली आहे. गुगल व सहकारी कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या मुंबई शहरापासून ओमानपर्यंत व पुढे सौदी अरेबियामार्गे जॉर्डनच्या अकाबा शहरापर्यंत केबलचा एक टप्पा असणार आहे. तर दुसरा टप्पा इटलीतून सुरू होऊन इस्रायलमार्गे अकाबापर्यंत आणून मग जोडण्यात येणार आहे.

यापूर्वी आशिया व युरोपला जोडणाऱ्या इंटरनेट फायबर ऑप्टिक केबल्स इजिप्तचा वापर करून उभारण्यात येत होत्या. मात्र यासाठी इजिप्तकडून भरमसाठ शुल्क आकारले जात होते. सौदी व इस्रायलमार्गे इंटरनेट केबल तयार झाल्यास त्यावरील खर्च सुमारे 50 टक्क्यांनी कमी होईल, असा दावा करण्यात येतो. त्यामुळे गुगलसह दूरसंचार व आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे या प्रकल्पाकडे लक्ष लागले आहे. इस्रायलने गुगला परवानगी दिल्याचे सांगण्यात आले असून सौदीकडून मान्यता मिळणे अद्याप बाकी असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) व बाहरिन या देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. सौदी अरेबियाने अद्याप अशा निर्णयाची घोषणा केलेली नसली, तरी सौदीच्या पाठिंब्यावरच युएई व बाहरिनने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. सौदीच्या नेतृत्त्वाखाली असलेला अरब-आखाती देशांचा गट पुढच्या काळात इस्रायलला मान्यता देऊन, पुढच्या काळात इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करील, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी, सौदी अरेबियाचा अघोषित दौरा करून प्रिन्स मोहम्मद बिन सलमान व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली होती. या भेटीपूर्वी सौदीचे परराष्ट्रमंत्री ‘फैसल बिन फरहान अल सौद’ यांनी देखील इस्रायलबरोबर संबंध सुरळीत करण्यासाठी काही अटींवर सौदी तयार असल्याचे म्हटले होते.

leave a reply