बंडखोर लिबियन नेत्याची इस्रायलला छुपी भेट

- इस्रायली वर्तमानपत्राचा दावा

लिबियनतेल अविव – लिबियातील कट्टरपंथी राजवटीविरोधात बंड पुकारणारे जनरल खलिफा हफ्तार यांचा मुलगा सद्दाम हफ्तार याने गेल्या आठवड्यात इस्रायलला भेट दिली. लिबियन बंडखोरांचे नेतृत्त्व करणार्‍या जनरल खलिफा यांचा विशेष संदेश घेऊन सद्दाम याने इस्रायलला भेट दिल्याची बातमी इस्रायली वर्तमानपत्रानी प्रसिद्ध केली. इस्रायलशी संबंध सुरळीत करण्याच्या मोबदल्यात सद्दामने इस्रायलकडे लष्करी व राजनैतिक सहाय्याची मागणी केल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला.

गेला वर्षभर लिबियाचे पंतप्रधान सराज आणि बंडखोर लष्करी अधिकारी जनरल हफ्तार यांच्या गटात मोठा संघर्ष सुरू होता. राजधानी त्रिपोलीवर सराज यांचा ताबा होता. तर जनरल खलिफा हफ्तार यांनी लिबियाच्या पूर्वेकडील भूभागावर नियंत्रण मिळविले आहे. या भागात येणारे बेंगाझी हे शहर म्हणजे आपली राजधानी असल्याचे हफ्तार यांनी घोषित केले होते. पण काही आठवड्यांपूर्वी लिबियन सरकार व बंडखोरांमध्ये संघर्षबंदी झाली असून डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, राजकीय व लष्करी समर्थन मिळविण्यासाठी जनरल खलिफा हफ्तार यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी खलिफा हफ्तार यांचा संदेश घेऊन सद्दामने गेल्या आठवड्यात युएईचा दौरा केला होता. यानंतर लिबियासाठी परतताना सद्दामचे खाजगी विमान इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर उतरल्याची बातमी इस्रायली वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली.

किमान ९० मिनिटांसाठी हे विमान इस्रायली विमानतळावर होते. सद्दाम हफ्तार यांनी यावेळी कुणाची भेट घेतली, याची माहिती या वर्तमानपत्राने उघड केली नाही. पण सद्दाम हफ्तार आणि इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादशी संलग्न अधिकार्‍यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता इस्रायली वर्तमानपत्राने वर्तविली आहे.

लिबियाच्या सत्तेवर आल्यास इस्रायलबरोबर अब्राहम करार करण्यासाठी जनरल खफिला हफ्तार तयार असल्याचा संदेश सद्दामने यावेळी दिल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला. याआधी युएई, बाहरिन तसेच सुदान व मोरोक्को या देशांनी इस्रायलबरोबर अब्राहम करार केला आहे. यामध्ये लिबिया सहभागी झाल्यास इस्रायलच्या समर्थक अरब आफ्रिकी देशांची आघाडी अधिक भक्कम होईल.

जनरल खलिफा हफ्तार हे लिबियातील सर्वात प्रबळ आणि प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. लिबियाच्या सत्तेवर पंतप्रधान फैझ सराज यांचे सरकार असले तरी खलिफा हफ्तार यांची लोकप्रियता अधिक असल्याचा दावा केला जातो. अमेरिकेचे बायडेन प्रशासन, तुर्की आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे समर्थन असलेले सराज यांचे सरकार कट्टरपंथीय असल्याचा आरोप केला जातो. तर खलिफा हफ्तार यांचे सरकार सर्वसमावेशक आणि कट्टरवादविरोधी असल्याचे बोलले जाते. फ्रान्स, रशिया, इजिप्त, युएई, जॉर्डन या देशांनी खलिफा हफ्तार यांना समर्थन दिले आहे.

leave a reply