चीनकडून आर्क्टिक क्षेत्रात हेरगिरी सुरू असल्याचा कॅनडाचा दावा

ओटावा/बीजिंग – चीनकडून आर्क्टिक क्षेत्रात हेरगिरी सुरू असल्याचा दावा कॅनडाने केला आहे. काही महिन्यांपूर्वी कॅनडाच्या लष्कराने राबविलेल्या एका मोहिमेत आर्क्टिक भागातील सागरी क्षेत्रात चिनी ‘बायोज्‌‍’(तरंगते उपकरण) आढळले होते. ही चिनी उपकरणे कॅनडाच्या संरक्षणदलाने आपल्या ताब्यात घेतली आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिका व कॅनडाच्या हद्दीत चीनचा ‘स्पाय बलून’ तसेच अनोळखी उडत्या वस्तू घिरट्या घालण्याची घटना समोर आली होती. त्यापाठोपाठ आता चीनकडून सागरी क्षेत्रातही हेरगिरीचे प्रयत्न चालू असल्याचे उघड झाले आहे.

कॅनडातील आघाडीचे दैनिक ‘द ग्लोब ॲण्ड मेल’ने चिनी हेरगिरीचे वृत्त उघड केले. गेल्या वर्षी कॅनडाच्या संरक्षणदलांनी देशाच्या सुरक्षेला असलेले धोके ओळखून त्यावर मात करण्यासाठी ‘ऑपरेशन लिम्पिड’ नावाची मोहीम राबविली होती. या मोहिमेअंतर्गत कॅनडाच्या संरक्षणदलांनी सागरी तसेच हवाई क्षेत्रात अतिरिक्त तैनातीसह नियमित गस्त सुरू केली होती. ही गस्त सुरू असताना आर्क्टिक क्षेत्राचा भाग असणाऱ्या कॅनडाच्या हद्दीत ‘चिनी बायोज्‌‍’चा वावर आढळला. कॅनडाच्या संरक्षणदलाने हे उपकरण ताब्यात घेतले. मात्र यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आली नव्हती.

चिनी स्पाय बलूनच्या घटनेनंतर अशा घटनांचा तपास करणाऱ्या कॅनडातील माध्यमांना चिनी बायोज्‌‍च्या घटनेसंदर्भात सुगावा लागला. कॅनडातील आघाडीचे दैनिक असणाऱ्या ‘द ग्लोब ॲण्ड मेल’ने याचा पाठपुरावा करीत चिनी हेरगिरीचे प्रकरण उघड केले. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कॅनडाच्या संरक्षण विभागाला याबद्दल खुलासा देणे भाग पडले आहे. ‘कॅनडाच्या सागरी तसेच हवाईहद्दीत चीनकडून सुरू असणाऱ्या हेरगिरीच्या कारवायांची संरक्षण विभागाला पूर्ण कल्पना आहे. चीनकडून दुहेरी वापरासाठीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग असणारी उपकरणे वापरण्यात येत आहेत’, असे कॅनडाच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते डॅनिअल ले बॉथिलिअर यांनी सांगितले.

कॅनडातील माजी लष्करी अधिकारी मायकल डे यांनी चीनकडून अमेरिकी पाणबुड्या तसेच आर्क्टिकमधील इतर संवेदनशील गोष्टींची टेहळणी करण्यासाठी ‘बायोज’ पाठविण्यात आले असावेत, असा दावा केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच चीनच्या ‘स्पाय बलून्स’चे प्रकरण उघड झाले होते. अमेरिकेने चीनचा स्पाय बलून उडवून दिल्याने त्यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अमेरिकेने अनावश्यक लष्करी बळाचा वापर करून बलून पाडल्याचा आरोप चिनी राजवटीने केला होता. त्यानंतर आता आर्क्टिकमध्ये ‘बायोज्‌‍’च्या सहाय्याने हेरगिरीची माहिती समोर आल्याने चीनच्या कारवायांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता दिसत आहे.

काही महिन्यांपूर्वी कॅनडाच्या गुप्तचर विभागाने चीनच्या राजवटीकडून कॅनडातील निवडणुकीत प्र्रभाव वापरण्यात येत असल्याचा इशारा दिला होता. यासंदर्भातील एक अहवालही कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेने तयार केला असून त्यावरून विरोधी पक्षांनी पंतप्रधान जस्टिन ट्य्रूड्यू व सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. कॅनडाने गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. मात्र व्यापारी व आर्थिक पातळीवरील चीनशी असलेले सहकार्य कमी करण्यात कॅनडाने फारशी उत्सुकता दाखविलेले नाही. कॅनडा सरकारकडून देण्यात येणाऱ्या कंत्राटांमध्ये तसेच देशातील अनेक संवेदनशील क्षेत्रात चिनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कॅनडाचे ट्य्रूड्यू सरकार चीनबाबत दुटप्पी व मिळमिळीत धोरण स्वीकारत असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहेत.

leave a reply