भारत पाकिस्तानला सहाय्य करू शकत नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा निर्वाळा

पूणे – भीषण भूकंपाने हादरलेल्या तुर्की व सिरियाला तसेच आर्थिक संकटाने ग्रासलेल्या श्रीलंकेला भारताने फार मोठे सहाय्य केले. पण अन्नधान्य, इंधन व औषधांच्या टंचाईने भेडसावणाऱ्या पाकिस्तानला भारत सहाय्य का करीत नाही, असा प्रश्न काहीजणांना पडलेला आहे. पाकिस्तानची सर्वसामान्य जनता भारताने सहाय्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. अशा परिस्थितीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत पाकिस्तानला सहाय्य करू शकत नाही, असे जाहीर केले आहे. ज्या देशात दहशतवादाकडे उद्योग म्हणून पाहिले जाते, त्या देशाला भारत कसे काय सहाय्य करू शकेल? असा प्रतिप्रश्न परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला आहे.

पूणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी पाकिस्तानसंदर्भातील भारताची भूमिका स्पष्ट शब्दात मांडली. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे सरकार थेट नाही, पण अप्रत्यक्षरित्या भारताकडून सहाय्याची अपेक्षा करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र सध्या दोन्ही देशांमध्ये राजनैतिक पातळीवरील संवादाची प्रक्रिया पूर्णपणे बंद असून ही प्रक्रिया सुरू झाल्याखेरीज भारताकडून सहाय्याची अपेक्षा करता येणार नाही, याची जाणीवही पाकिस्तानला झालेली आहे. म्हणूनच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताबरोबरील तीन युद्धातून पाकिस्तानला योग्य तो धडा मिळाल्याचे सांगून भारताला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. यावर पाकिस्तानातून जहाल प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांना हा प्रस्ताव मागे घ्यावा लागला होता. पण त्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या माजी प्रमुखांनी देखील भारताबरोबरील चर्चेबाबत लक्षणीय विधान केले होते.

लष्करी व सुरक्षेच्या परिघाबाहेर जाऊन पाकिस्तानची भारताशी चर्चा होऊ शकते, असे पाकिस्तानी लष्कराचे माजी अधिकारी मेजर जनरल अथर अब्बास यांनी सुचविले होते. सध्याची पाकिस्तानची अवस्था बिकट बनली असून जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठीही या देशाच्या तिजोरीत निधी राहिलेला नाही. अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ यांच्यासह इंधन व औषधांसारख्या गोष्टींचा तुटवडा पाकिस्तानातील जनतेला जाणवत असून संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आपला असंतोष व्यक्त करीत आहेत. या संकटातून केवळ आणि केवळ भारतच आपल्याला बाहेर काढू शकतो, याची जाणीव पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्या पत्रकार व बुद्धिमंतांनाही झालेली आहे. त्यांनी केलेली विधानेच याची साक्ष देत आहेत.

आम्हाला भारतासारखे नेतृत्त्व हवे, असे पाकिस्तानातील काहीजण उघडपणे बोलू लागले असून मागच्या काही वर्षात भारताने केलेल्या नैत्रदीपक प्रगतीचा दाखला ही मंडळी देत आहेत. अशा परिस्थितीत, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताची भूमिका सुस्पष्ट केली. ज्या देशात दहशतवादाकडे उद्योग म्हणून पाहिले जाते, त्याला भारत कसे काय सहाय्य करू शकतो, असा प्रश्न परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला. इतकेच नाही तर देशाची आर्थिक घडी बसविण्याच्या आधी या देशाला आपली राजकीय व सामाजिक घडी नीट बसवता आली पाहिजे, असे सांगून जयशंकर यांनी पाकिस्तानच्या सामाजिक रचनेमध्ये असलेल्या मुलभूत दोषांवर बोट ठेवले.

जग फार फार तर पाकिस्तानला सहाय्य पुरवू शकेल, पण आपल्या देशात या साऱ्या सुधारणा पाकिस्तानलाच घडवाव्या लागतील आणि त्यासाठी कठोर निर्णय घेऊन योग्य गोष्टींची निवड करावी लागेल, याची परखड जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. आधुनिक इतिहासात भारतालाही वेळोवेळी अशा स्वरुपांच्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. ३० वर्षांपूर्वी भारतासमोरही आर्थिक संकट खडे ठाकले होते. पण भारताने योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले, याची आठवण जयशंकर यांनी करून दिली. पाकिस्तान असे निर्णय घ्यायला तयार नाही आणि म्हणूनच हा देश संकटातून बाहेर पडणे अवघड असल्याचे संकेत जयशंकर यांनी याद्वारे दिले आहेत.

देश आपल्या सुरक्षेसाठी कुठलेही टोक गाठेल – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

राष्ट्रीय सुरक्षेसाठी कुठल्याही टोकाला जाण्याची तयारी असलेला देश, अशी जगभरात भारताची प्रतिमा उभी राहिलेली आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे. भारताला कुणीही धक्का देऊन मागे ढकलू शकत नाही आणि आपण आखलेल्या मर्यादारेषेचे उल्लंघन भारत कधीही खपवून घेत नाही, असे सांगून जयशंकर यांनी भारताच्या परराष्ट्र तसेच सुरक्षाविषयक धोरणात झालेल्या या आक्रमक बदलांची नोंद केली.

उत्तरेकडील सीमेवर देशाच्या सुरक्षेला आव्हाने मिळाली होती. पण भारताने त्याचा अत्यंत समर्थपणे सामना केला, असे सांगून जयशंकर यांनी आपण नक्की कुणाबद्दल बोलत आहोत, याचे संकेत दिले. २०१६ व २०१९ साली देशाच्या सुरक्षेला उत्तरेकडील सीमेवरून आव्हान मिळाले होते. पण भारताने त्याचा समर्थपणे सामना केला, याची आठवण जयशंकर यांनी करून दिली.

डोकलाम तसेच गलवानमध्ये चीनच्या लष्कराबरोबर झालेल्या संघर्षानंतर भारताच्या सैन्याची क्षमता प्रकर्षाने जगासमोर आली. त्याचवेळी आपल्या सुरक्षेच्या मुद्यावर भारत चीनसारख्या प्रबळ देशाशी टक्कर घेऊ शकतो, हे या निमित्ताने जगासमोर आले होते. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले होते. याचा अस्पष्टसा दाखला पररष्ट्रमंत्र्यांच्या या उद्गारांमधून मिळत आहे.

दरम्यान, एलएसीवर भारत व चीनमधील तणाव अजूनही निवळलेला नाही, असा दावा भारताकडून सातत्याने केला जातो. सीमेवर हा तणाव कायम असताना देखील भारत चीनकडून करीत असलेल्या आयातीत मोठी वाढ झालेली आहे. या आयातीला भारताच्या उद्योगानेही हातभार लावला असून याचा दोष निदान काही प्रमाणात भारतीय उद्योगक्षेत्रालाही द्यायला हवा, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. आपली पुरवठा साखळी विकसित करण्याच्या ऐवजी भारतीय उद्योगाने चीनकडून आयात सुरू ठेवली आणि त्याचे फार मोठे धक्के भारताला बसले, अशी टीका जयशंकर यांनी केली. देशाने सेवा क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे, उत्पादनाकडे दुर्लक्ष केले तरी चालेल, अशा स्वरुपाचे धोरण आधीच्या काळात स्वीकारण्यात आले होते. त्याचा धोरणात्मक पातळीवर फार मोठा फटका भारताला बसला व आजच्या भारताला त्याचे परिणाम सहन करावे लागत आहेत, असा दावा जयशंकर यांनी केला.

leave a reply