‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलन रोखण्यासाठी कॅनडा ‘इमर्जन्सी पॉवर्स’ वापरणार

‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ओटावा/पॅरिस/वॉशिंग्टन – गेल्या महिन्यापासून कॅनडात सुरू असलेले ट्रकचालकांचे ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलन रोखण्यासाठी कॅनडा सरकार ‘इमर्जन्सी पॉवर्स’चा वापर करु शकते, असा इशारा वरिष्ठ मंत्री बिल ब्लेअर यांनी दिला. हे आंदोलन फक्त कोरोनाच्या नियमांविरोधात नसून त्यात इतरही घटक आहेत व ही बाब चिंताजनक असल्याचा दावा ब्लेअर यांनी यावेळी केला. कॅनडातून सुरू झालेल्या ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलनाची व्याप्ती वाढत असून फ्रान्स तसेच नेदरलॅण्डमध्ये ट्रकचालकांनी निदर्शने केल्याचे समोर आले. तर अमेरिकेतील वरिष्ठ सिनेटर रँड पॉल यांनी ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलनाला आपले समर्थन असल्याचे जाहीर केले आहे.

‘फ्रीडम कॉन्व्हॉय’कॅनडा सरकारने कोरोनासंदर्भात केलेल्या नव्या नियमांविरोधात ट्रकचालकांनी आंदोलनाची घोषणा केली होती. पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांनी दिलेले आदेश धुडकावून हजारो ट्रकचालक गेल्या महिन्याच्या अखेरीस राजधानी ओटावात दाखल झाले. ट्रकचालकांनी संसदेनजिकच्या परिसरासह शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये आपले ट्रक उभे करून ठेवले आहेत. त्याचवेळी राजधानी ओटावासह क्युबेक, टोरोंटो व इतर अनेक शहरांमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत.

‘फ्रीडम कॉन्व्हॉय’कॅनडा सरकारने आंदोलन रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षायंत्रणा तैनात केल्या आहेत. त्याचवेळी ट्रकचालकांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा इशाराही दिला आहे. ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलनाविरोधात काही सरकारसमर्थक गट रस्त्यावरही उतरले आहेत. सरकारने अतिरिक्त यंत्रणा तैनात करून अमेरिकेला जोडणार्‍या एका ब्रिजवरील आंदोलकांना बाजूला करण्यात यश मिळविले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून ट्रकचालकांनी आपले आंदोलन पुढे कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

‘फ्रीडम कॉन्व्हॉय’सुरुवातीला फक्त कॅनडापुरत्या मर्यादित असलेल्या या आंदोलनाचे पडसाद आता युरोपातही उमटू लागले आहेत. शनिवारी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शेकडो ट्रकचालकांनी धडक मारून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नेदरलॅण्डच्या हेग शहरातही ट्रकचालकांनी ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलनाला समर्थन देण्यासाठी निदर्शने केली. फ्रान्स व नेदरलॅण्डमधील ट्रकचालक पुढे बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये धडक मारणार असल्याचे संबंधित गटांकडून सांगण्यात आले. युरोपपाठोपाठ न्यूझीलंडमध्येही ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ला पाठिंबा देणारी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये अमेरिका तसेच कॅनडाचे झेंडेही फडकवण्यात आले.

दरम्यान, अमेरिकेच्या संसदेतील वरिष्ठ सिनेटर रँड पॉल यांनीही ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. अमेरिकेतील ट्रकचालकांनी राजधानी वॉशिंग्टनमध्ये येऊन ठिय्या द्यावा, असे आवाहनही पॉल यांनी केले. अमेरिकेतील या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर, ‘डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटी’ने अतिरिक्त सुरक्षापथके तैनात करण्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply